मुंढवा पोलिसांनी केली कारवाई : १९ वर्षीय तरूणाचे आत्महत्या प्रकरण
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : यश ज्योती डेबीट कन्सल्टन्सी कंपनीत काम करणार्या एका १९ वर्षीय तरूणास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी कंपनीच्या मॅनेजर ऐश्वर्या जोशी यांच्यासह ५ जणांविरूध्द मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिषने दि. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली आहे.
आशिष व्यंकट कामनबोयना (१९, रा. सर्व्हे नं. ७१, बालाजीनगर, लेन नं. १, घोरपडी गाव, पुणे) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुजाता व्यंकट कामनबोयना (३६) यांनी फिर्याद दिली असून, ऐश्वर्या जोशी, महिंद्र सागर, रोहन मस्करा, सुनिल जाधव आणि जोशी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, आशिष काम करत असलेल्या यश ज्योती डेबीट कन्सल्टन्सी कंपनीमधील त्याचे ग्राहकाचे ३० हजार रूपये त्याचा मित्र नितीन कुमार याचे खात्यावर घेवुन ती त्याने खर्च केली. कंपनीचे पैसे खर्च केल्याचे मॅनेजर ऐश्वर्या जोशी यांना माहित झाले. त्यानंतर आशिष आणि फिर्यादी यांनी ती रक्कम कंपनीमध्ये जावुन भरली. रक्कम डिपॉझिट केल्यानंतर देखील ऐश्वर्या जोशी, महिंद्र सागर, रोहन मस्करा, सुनिल जाधव आणि जोशी यांनी आशिष यास दररोज कंपनीमध्ये बोलावुन अजुन रक्कम घेतल्याची भीती घालुन त्याचा मानसिक छळ केला आणि त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.
मुंढवा पोलिसांनी तक्रार प्राप्त झाल्यानंतर कंपनीच्या मॅनेजर ऐश्वर्या जोशी यांच्यासह महिंद्र सागर, रोहन मस्करा, सुनिल जाधव आणि जोशी यांच्याविरूध्द भादंवि ३०६ (आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक माने अधिक तपास करीत आहेत.
