समर्थ पोलीस स्टेशनमध्ये अरविंद बरके, गणेश बरके आणि नंदा बरके यांच्याविरूध्द गुन्हा
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : बनावट नोटरी बनवून पेट्रोल पंपाच्या व्यवसायात १० टक्के भागीदारी देण्याचे दर्शवून एका ज्येष्ठ नागरिकाची १ कोटी १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ५ फेब्रुवारी २०१६ ते ३१ ऑगस्ट २०१८ दरम्यान घडला.
याप्रकरणी रवींद्र यादव मोहिते (वय ६१, रा. मंगळवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अरविंद पांडुरंग बरके, गणेश पांडुरंग बरके व एक महिला (सर्व रा. गृहलक्ष्मी सोसायटी, सोमवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी रवींद्र यादव मोहिते यांना पेट्रोल पंपचा व्यवसाय करायचा होता. आरोपी यांना या व्यवसायाची माहिती असल्याने त्यांनी फिर्यादी यांना वाडिया कॉलेजसमोरील भारत पेट्रोल पंप विकत मिळवून देतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. अरविंद व गणेश बरके यांनी त्यांच्या बँक खात्यावरुन जनता ऑटोमोबाइल्स व कांचन सरसी सेंटर, बॉम्बे गॅरेज या नावाने असलेल्या बँक खात्यात १ कोटी ११ लाख २० हजार रुपये आरटीजीएसने ट्रान्सफर करण्यास सांगितले.
फिर्यादी व आरोपी यांच्यात बनावट नोटरी बनवून फिर्यादी यांना १० टक्के भागिदारी दिल्याचे भासविले. या भागीदारीनुसार फिर्यादी यांची रक्कम भांडवलरुपी असेपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये दर महिन्यास १ लाख रुपये जमा होतील, असे सांगून रक्कम जमा केली नाही. तसेच फिर्यादी यांच्या मुलाने आरोपींना ४ लाख ८० हजार रुपये वेळोवेळी पाठवून फिर्यादी यांना वाडिया कॉलेज समोरील भारत पेट्रोलियाम सेल्स कंपनीचा पेट्रोल पंप देण्यास टाळाटाळ करुन फिर्यादी यांची १ कोटी १६ लाख रुपयांची फसवणूक केली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.