हडपसर-सहकारनगर हद्दीतील गुन्हेगार : अमिताभ गुप्ता यांची मोका कायद्यान्वये कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील हडपसर आणि सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांवर एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 46 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे. त्यानुसार गुन्हेगारांवर मोक्का, तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.
हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अजहरुद्दीन उर्फ हजरुद्दीन उर्फ अज्जु मेहबुब शेख (वय-29 रा. नवीन म्हाडा कॉलनी, हिंगणे मळा, हडपसर) आणि सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार राजू राम उर्फ जटाळ्या उमाप (वय-25 रा.आण्णाभाऊ साठे वसाहत, अरण्येश्वर) अशी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या दोन सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.
अज्जु शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह हडपसर, वानवडी परिसरात कोयता, लाकडी बांबू यासारख्या हत्यारांसह फिरत असताना खुन, जबरी चोरी, दुखापत, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 8 गंभीर गुन्हे हडपसर पोलीस ठाण्यात दाखल आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे व बाळकृष्ण कदम यांनी आरोपी अज्जु शेख याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांना सादर केला होता.
सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार राजू राम उर्फ जटाळ्या उमाप याने त्याच्या साथिदारांसह सहकारनगर,
भारती विद्यापीठ, दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे केले आहेत.
आरोपी उमाप याच्यावर गावठी कट्टा, हॉकी स्टीक, लोखंडी कोयता, पालघन, रॉड यासारख्या हत्यारांसह परिसरात फिरत असताना त्याने साथीचा रोग कायद्याचे उल्लंघन, खुनाचा प्रयत्न, दुखापत, जाळपोळ, जबरी चोरी, विनापरवाना पिस्टल बाळगणे, सरकारी नोकरांवर हल्ला करणे या सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 8 गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांनी उमाप याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांना दिला होता.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन दोन्ही गुन्हेगारांवर एमपीडीए अॅक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्तांनी मागील एक वर्षात 46 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.