विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : तरुणीसह पाच सापडले अडचणीत
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या तरुणाबरोबर लग्न केले. तरुणाच्या वडिलांकडून वेळोवेळी लाखो रुपये घेतले अन् एके दिवशी घरातील दागिने घेऊन तिने पोबारा केला. या प्रकारामुळे पाचजण चांगलेच अडचणीत सापडले आहेत. हा प्रकार ३१ जानेवारी ते २१ जुलै दरम्यान घडला.
याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी या तरुणीसह ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कैलासकुमार मानकमल सिंघवी (वय ४५), सारिका नंदलाल बंब (वय २५, रा. नाशिक), नंदलाल बंब (वय ६०), कमलाबाई नंदलाल बंब (वय ५९) आणि राजू कोठारी (वय ४०) या यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी विमाननगरमधील एका ३० वर्षाच्या तरुणाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी हे दोन्ही डोळ्यांनी अंध असल्याचे माहिती असताना सुद्धा आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी कट रचला. सारिका बंब हिचे बनावट आधार कार्ड तयार करुन ते फिर्यादी व त्यांच्या वडिलांना दाखविले. तिचे फिर्यादीसोबत लग्न लावून दिले. त्यानंतर फिर्यादी यांच्या वडिलांकडून त्यांनी वेळोवेळी ८ लाख ७३ हजार रुपये घेतले. त्यानंतर सारिका असे नाव सांगणारी फिर्यादीची पत्नी ३३ हजार ३५८ रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने व कपाटातील २० हजार रुपये रोख असा ऐवज घेऊन घरातून पळून गेली. फिर्यादी यांना आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सर्व खात्री करुन विमानतळ पोलिसांशी संपर्क साधून आता फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक कोल्लुरे तपास करीत आहेत.
नाशिक नंतर पुण्यात घडला प्रकार…
राजस्थानमध्ये अनेक तरुणांना उपवर वधु मिळत नसल्याचा गैरफायदा घेऊन काही ठग अशा तरुणांच्या आईवडिलांना गाठतात. त्यांच्या मुलीचे लग्न तुमच्या मुलाशी लावून देतो, असे सांगून त्यांच्याकडून पैसे घेतात. त्यानंतर त्यांचे मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न लावले जाते. त्यानंतर माहेरी पाठवणीच्या वेळी काहीतरी निमित्त काढून वधू व तिचे नातेवाईक पैसे व मुलीच्या अंगावर घातलेल्या दागिन्यासह पळून जात असल्याच्या काही घटना नाशिक परिसरात यापूर्वी घडल्या होता. तसाच प्रकार पुण्यात घडला आहे.
