युनिट-१ व ५ ची धडाकेबाज कारवाई : शिवाजीनगर न्यायालयाबाहेरच सात जणांना बेड्या ठोकल्या
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे :गुन्हे शाखेने गेल्या वर्षी गुन्हेगारांना जामीन मिळवून देणार्या रॅकेटचा भांडाफोड केला होता. आता पुन्हा एकदा शिवाजीनगर न्यायालयाबाहेर कारवाई करुन गुन्हेगारांना बनावट कागदपत्राद्वारे जामीन मिळवून देणार्या ७ जणांना बेड्या ठोकल्या.
गोपाळ पुंडलिक कांगणे (वय ३३, रा. मोरवाडी, पिंपरी), सागर अनंत काटे (वय २५, रा. पिंपळे गुरव), दिनकर सुंदर कांबळे (वय ३८, रा. आनंदनगर, चिंचवड), हसन हाजी शेख (वय २५, रा. पिंपळे गुरव), रोहित विद्यासागर पुटगे (वय २४), किरण दादाभाऊ सूर्यवंशी (वय २७) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याशिवाय रवी वाघमारे (वय २९), विजय भास्कर, राकेश परदेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ शेडगे यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. गेल्या वर्षी पोलिसांनी उघडकीस आणलेल्या या बनावट जामीनदार प्रकरणात सुमारे ३० जणांना अटक केली होती. त्यातील काही आरोपी या प्रकरणात पुन्हा अशाच प्रकारे बनावट कागदपत्राद्वारे जामीन मिळवून देताना आढळून आले आहेत.
शिवाजीनगर न्यायालय, तसेच लष्कर, पिंपरी, मोरवाडी व इतर न्यायालयात जबरी चोरी, दरोडा, पोक्सो सारख्या गंभीर गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींना जामीन करुन देण्यासाठी यांनी बनावट आधार कार्ड, रेशन कार्ड, ७/१२ उतारा व खोटे शिक्के वगैरे तयार करुन खोटे शासकीय दस्तऐवज तयार केले. ज्या आरोपींना जामीनदार नसतो. तसेच काही आरोपी जामीनावर सुटल्यानंतरही पुन्हा कोर्ट कामासाठी हजर राहत
नाही अशा आरोपींना जामीन देण्यासाठी एजंटमार्फत बोगस जामीनदार तयार करतात. खोटे दस्तऐवज तयार करुन न्यायालयात ते खरे असल्याचे भासवून न्यायालयाची दिशाभूल केली जाते. याची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या पथकाने गुरुवारी सकाळी शिवाजीनगर न्यायालयाबाहेरील रोडवर धाड टाकून ७ जणांना पकडले. त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड, रेशन कार्ड, बनावट ७/१२ उतारे जप्त केले आहेत. या आरोपींनी कोणाकोणाला आतापर्यंत जामीन राहिले याची माहिती घेतली जात आहे.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या सूचनांनुसार पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथक-१चे सहायक पोलीस निरीक्षक भोसले, विवेक पडवी, पोलीस उपनिरीक्षक खडके, शेडगे, जाधव, संजय गायकवाड, गुंगा जगताप, टेंगले, काळे, पोलीस अंमलदार मनोज साळुंके, संदीप जाधव, राहुल जोशी, मारुती पारधी, विशाल दळवी, पांडुरंग पवार, प्रवीण उत्तेकर, विश्वनाथ घोणे, गणेश लोखंडे, रेहाना शेख, नीतेश जाधव, योगेश मोहिते यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
