पोलिसांनी तत्परता दाखवत आत्मदहनापासून रोखले : महिलेची लैंगिक शोषण केल्याविरोधात बिबवेवाडी पोलिसांत फिर्याद
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : बारामती शहरातील बड्या उद्योजकाने लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत पुण्यातील एका महिलेने बारामती शहरातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर आत्महदन करण्याचा प्रयत्न केला. आत्महन करण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी तातडीने महिलेच्या दिशेने धाव घेत तिला आत्मदहन करण्यापासून रोखले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेने बारामती शहरातील बड्या उद्योजक तसेच नगरपरिषदेचा माजी पदाधिकारी याच्या विरोधात 13 वर्षे शोषण केल्याचा आरोप केला आहे. हा माजी पदाधिकारी उद्योजक राष्ट्रवादी काँग्रेसविरोधी आहे. महिलेने केलेल्या आरोपासंबंधित प्रकरण हे पुण्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहे. परंतु पोलीस दखल घेत नसल्याचा आरोप महिलेने केला.
या महिलेने सोमवारी (दि.15) सकाळी दहाच्या सुमारास टोकाचे पाऊल उचलत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळीच पोलीस पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला.
पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेऊन तिचे समुपदेशन करीत मतपरीवर्तन केले. यापुढे अशा प्रकारचे कृत्य करणार नसल्याचे महिलेने लेखी लिहून दिले आहे. महिलेसंबंधित प्रकरण बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहे. या महिलेला पोलीस पुण्यात नेऊन सोडणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली.
