पुण्यात उडाली खळबळ : भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत केला पंचनामा
महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क
पुणे : जांभूळवाडी दरीपूलाजवळ एका तृतीयपंथीचा मृतदेह आढळून आला आहे. हा प्रकार (मंगळवार) सकाळी दरीपूलाजवळील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या शेजारील रस्त्यावर उघडकीस आला आहे. मॉर्निंग वॉक करण्यासाठी आलेल्या नागरिकांनी नियंत्रण कक्षाला माहिती कळविली, त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
सागर उर्फ सारिका उजागरे (वय-25 रा. म्हाडा कॉलनी, हडपसर) असे खून झालेल्या तृतीयपंथीचे नाव आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पुणे-सोलापूर महामार्गावर एका तृतीयपंथीचा मृतदेह आढळून आला आहे. आठवड्याभरात दोन तृतीयपंथीचा खून झाला आहे.
पोलिसांनी सांगितले की, मंगळवार, दि. २२ नोव्हेंबर सकाळी परिसरातील नागरिक मॉर्निंग वॉक करण्यासाठी जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला मृतदेह आढळून आला. नागरिकांनी घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना घटनास्थळी एका तृतीयपंथी व्यक्तीचा मृतदेह दगडावर पडलेला आढळून आला. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता.
दगडाने ठेचून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत.
