सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी : 2 पिस्टल, 3 काडतुसे असा ७० हजार रुपयांचा ऐवज केला जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : बेकायदेशीर पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगल्या प्रकरणी दोघांना पुण्यात अटक करण्यात आली आहे. सिंहगड रोड पोलिसांनी वडगाव बु येथील फन टाईम थिएटरच्या मागील कालव्यावरील रस्त्यावर कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी 2 पिस्टल आणि 3 जिवंत काडतुसे असा एकूण 70 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
दीपक उर्फ भैय्याजी धनाजी जगताप (वय-26 रा. मु.पो. रांझे ता. भोर), हर्षल दिलीप चव्हाण (वय-22 सध्या रा. मु.पो. ढाकाळी पणदरे, ता. बारामती मुळ रा. मु.पो. संभाजी चौक खंडाळा, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी दिपक उर्फ भैय्याजी धनाजी जगताप हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी 4 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील तपास पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अमंलदार उज्ज्वल मोकाशी यांना वडगाव बु येथील फनटाईम थिएटरच्या मागील बाजूस असलेल्या कालव्यावरील रस्त्यावर दोन व्यक्ती गावठी पिस्टल घेऊन थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सापळा लावला. मात्र, पोलिसांना पाहताच आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आरोपींचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता जगताप याच्या कमरेला 40 हजार रुपये किमतीचे पिस्टल आणि खिशात 600 रुपयाचे दोन जिवंत काडतुसे सापडली. तर हर्षल चव्हाण याच्याकडे 30 हजार रुपये किमतीचे पिस्टल आणि 300 रुपये किमतीचे एक जिवंत काडतुस सापडले.
अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पोर्णिमा गायकवाड, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलीस निरीक्षक गुन्हे प्रमोद वाघमारे यांच्या मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस उपनिरीक्षक कुलदिप संकपाळ, पोलीस अंमलदार उज्ज्वल मोकाशी, शंकर कुंभार, सचिन माळवे, किशोर शिंदे, सागर भोसले, इंद्रजित जगताप, सुहास मोरे, अमोल पाटील, अमित बोडरे, विकास पांडोळे, विकास बांदल, अविनाश कोंडे, देवा चव्हाण यांच्या पथकाने केली.

















