सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद : शादी डॉट कॉमवर झालेल्या ओळखीतून घडला प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : लष्करात सुभेदार रेकॉर्ड क्लार्क पदावर असल्याचे सांगून एकाने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. नवले पुलाजवळील लॉजवर १८ नोव्हेंबर रोजी प्रकार घडला आहे.
याबाबत मॉडेल कॉलनीत राहणार्या एका ३० वर्षाच्या तरुणीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि आरोपी यांची शादी डॉट कॉम या लग्न जमविणार्या वेबसाईटच्या माध्यमातून ओळख झाली. आरोपीने आपण आर्मीमध्ये सुभेदार रेकॉर्ड क्लार्क पदावर आहे, असे सांगून त्या पदाचा गणवेश घालून फिर्यादीसोबत लग्न करतो, असे आश्वासन देऊन विश्वास संपादन केला. त्याने आपले नाव प्रशांत बाबुराव पाटील असे सांगितले. त्याने फिर्यादी यांना १८ नोव्हेंबर रोजी नवले पुलाजवळील एका लॉजमध्ये नेले. तेथे फिर्यादी यांचा विरोध असताना त्यांच्यावर जबरदस्तीने शारीरीक तसेच अनैसर्गिक संबंध ठेवले. त्यानंतर त्याचा काहीही संपर्क होऊ न शकल्याने फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे.















