वारजे-माळवाडी पोलिसांत गुन्हा : वारजेतील आनंदनगरमध्ये घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : किराणा दुकानामध्ये साहित्य आणण्यासाठी चाललेल्या महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी ५५ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना बुधवारी (दि. २४ नोव्हेंबर २०२१) सकाळी सातच्या सुमारास वारजेतील आनंद कॉलनीत घडली.
याप्रकरणी महिलेने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिला काल सकाळी सातच्या सुमारास किराणा दुकानात साहित्य आणण्यासाठी चालल्या होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ५५ हजारांचे मंगळसूत्र हिसका मारून तोडून नेले. महिलेने आरडा-ओरडा करेपर्यंत चोरटे पसार झाले. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक आर. एन. पारवे तपास करीत आहेत.














