वानवडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : शहरात चंदन चोरीच्या घटनांमध्ये होतेय वाढ
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात मागिल काही दिवसांत चंदनचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यातील बहुतांश झाडे महत्त्वाच्या संस्था, कंपन्यांच्या आवारातील असल्याने या परिसरातील सुरक्षेवर ही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यातच आता पुण्यातील वानवडी येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या आवारातील चंदनाची चार झाडे चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी एसआरपीएफ आवारातील चार चंदनाची झाडे कापून नेली आहे. दोन महिन्यांपूर्वी अशीच घटना या ठिकाणी घडली होती.
याप्रकरणी राज्य राखीव पोलीस दलाचे सहायक पोलीस फौजदार विक्रांत सूर्यवंशी यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वानवडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य राखीव पोलीस दलाचे परिसर विस्तीर्ण आहे. मुख्यालयाच्या आवारात असलेली चार चंदनाची झाडे चोरट्यांनी कापून नेल्याची घटना उघडकीस आली. शहरात गेल्या काही महिन्यांपासून चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. शासकीय कार्यालये तसेच बंगल्यांच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्यात आली आहेत. पोलीस हवालदार आर. आर. रासगे तपास करत आहेत.


















