कोंढव्यातील भाग्योदयनगरमधील घटना : वीजबिल थकबाकीदाराचे वीज खंडित करताना घडला प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात महावितरण कंपनीकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची कारवाई सुरु आहे. महावितरणकडून पुण्यात सुरु असलेल्या कारवाई दरम्यान कर्मचाऱ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याची घटना कोंढवा येथे घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.25) सकाळी दहाच्या सुमारास शाह हाईट्स, भाग्योदय नगर, कोंढवा येथे घडली.
याप्रकरणी एकावर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, महावितरणच्या रास्तापेठ विभाग अंतर्गत कोंढवा शाखा कार्यालयाचे कर्मचारी दशरथ अंबादास मुंडे सहकाऱ्यासमवेत गुरुवारी (दि. 25) शाह हाईट्स, भाग्योदय नगर, कोंढवा येथील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करीत होते. यावेळी दोन थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडित करून त्यांनी वीजमीटर ताब्यात घेतले असता आरोपी इरशाद शाह या व्यक्तीने महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. तसेच ताब्यात घेतलेले मीटर त्याने परत घेतले. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.


















