समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : गाडी पुढे कोणी न्यायची या वादातून घडला प्रकार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : गाडी पुढे कोणी न्यायची या कारणावरुन रिक्षाचालक व कारचालकांमध्ये झालेल्या वादात रिक्षाचालकाने पोलीस कर्मचार्याच्या मांडीवर लाथ मारुन त्यांना जखमी केले. हा प्रकार तारांचद हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर सोमवारी सायंकाळी साडे सात वाजता घडला.
समर्थ पोलिसांनी रिक्षाचालक इलियास महम्मद शेख (वय ४४, रा. नाना पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुभाष पिंगळे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, रिक्षाचालक शेख व ब्रीजा कारचालक यांच्यात गाडी पुढे नेण्याच्या कारणावरुन ताराचंद हॉस्पिटलसमोरील रोडवर वाद झाला. तेव्हा शेख याने चारचाकी गाडीच्या काचेवर हाताने मारुन नुकसान केले. पोलीस अंमलदार सुभाष पिंगळे हे कर्तव्यावर तेथे पोहचले. पिंगळे यांनी पोलीस असल्याचे सांगून ओळखपत्र दाखविले असताना शेख फिर्यादी यांच्या अंगावर धावून गेले व त्यांच्या मांडीवर लाथ मारुन जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबक अधिक तपास करीत आहेत.

















