शिवाजीनगर कौटुंबिक न्यायालयातच घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : घटस्फोटाला नकार दिल्याने रागाच्या भरात पतीने भर कौटुंबिक न्यायालयातच पत्नीच्या तोंडावर जोरात बुक्की मारुन तिचा दात पाडला. ही घटना शिवाजीनगर येथील कौंटुंबिक न्यायालयातील दुसर्या मजल्यावरील समुपदेशन केंद्राच्या बाहेर २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडली.
याप्रकरणी सोलापूर येथे राहणार्या पत्नीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सचिन विकास पवार (वय ३४, रा. खेसे पार्क , विमाननगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि आरोपी हे पतीपत्नी आहेत. दोघेही सध्या वेगळे रहात आहेत. घटस्फोटाच्या केसच्या कौन्सिलिंगसाठी ते शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात आले होते. यावेळी समुपदेशन केंद्रात फिर्यादी यांनी त्यांच्या पतीच्या विनंतीप्रमाणे घटस्फोट देण्यास नकार दिला. त्यानंतर ते केंद्राच्या बाहेर आल्यावर सचिन पवार याने फिर्यादी यांच्या तोंडावर हाताने जोरात बुक्की मारली. त्यात फिर्यादी यांचा एक दात पडला व खालील बाजूचा एक दात अर्धा तुटून त्या जखमी झाल्या. सहाय्यक पोलीस निरीक्षक माने अधिक तपास करीत आहेत.

















