खडक पोलिसांत गुन्हा : उपचारादरम्यान २८ नोव्हेंबर रोजी झाला मृत्यू
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : लोहियानगरमध्ये महिलेच्या शारीरीक व मानसिक त्रासाला कंटाळून ४० वर्षाच्या तरुणाने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली. ससूनमध्ये उपचारादरम्यान त्याचा २८ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला.
दत्तात्रय तानाजी ढावरे (वय ४०, रा. लोहियानगर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एका महिलेविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि आरोपी हे एकाच ठिकाणी राहण्यास आहे. आरोपी महिलेने फिर्यादी यांचे पती दत्तात्रय ढावरे यांना मानसिक व शारीरीक त्रास दिल्याने तिच्या या नेहमीच्या त्रासाला कंटाळून ढावरे यांनी स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. गंभीर भाजलेल्या अवस्थेत त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना त्यांचे २८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजता निधन झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी तपास करीत आहेत.
