पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची 61 वी कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : आपली दहशत निर्माण करण्यासाठी व बदला घेण्यासाठी गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्या निलेश गायकवाड याच्यासह त्याच्या टोळीतील 11 जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गेल्या सव्वा वर्षात केलेली ही 61 वी ‘मोक्का’ कारवाई आहे.
निलेश विजय गायकवाड (रा. रामनगर, वारजे), अक्षय रवींद्र खवळे, ऋतिक कैलास एखंडे (रा. म्हात्रे पुलाजवळ), विकी ऊर्फ हेमंत धर्मा काळे (रा. रामनगर, वारजे), मोन्या ऊर्फ रामेश्वर सुभाष मोरे, कार्तिक संजय इंगवले (वय १८), अनिरुद्ध ऊर्फ बाळा राजू जाधव (वय २४, रा. रावेत गाव), अरविंद मारुती माडकर (वय ३०, रा. रामनगर, वारजे), अक्षय ऊर्फ अवधुत महेश यादव (वय २७), संकेत राजेंद्र ढेणे (वय २३, रा. वारजे), विकास कैलास गव्हाड (वय २०, रा. सहयोगनगर, वारजे) अशी ‘मोक्का’ कारवाई झालेल्या गुंड्यांची नावे आहेत.
निलेश गायकवाड टोळीने वारजे, उत्तमनगर परिसरातील आपल्या टोळीची दहशत निर्माण केली आहे. त्यांनी खून, खुनाचा प्रयत्न, शस्त्रे बाळगणे, बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करुन दहशत निर्माण केली होती.
केदार भालशंकर हा मोटारीने जात असताना ८ ऑगस्ट रोजी शिवणे स्मशानभूमी ते एनडीए रोड दरम्यान पाठलाग करुन निलेश गायकवाड व त्याच्या साथीदारांनी गोळीबार करुन त्याला जखमी करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता.
उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर यांनी पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांच्या मार्फत अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. राजेंद्र डहाळे यांनी या प्रस्तावाची पडताळणी करुन मोक्का कारवाईला मंजुरी दिली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली ही आतापर्यंतची 61 वी कारवाई आहे.
