पुण्यातील खळबळजनक घटना : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्यांच्यासोबत हुज्जत घालून पोलिसांना मारहाण करण्याचे प्रकार पुण्यात अनेक ठिकाणी घडत आहेत. वाहतूक पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्या तरुणाला पोलीस चौकीत आणल्यानंतर त्याने चौकीतच राडा घातला. एवढेच नाहीतर पोलीस चौकीमधील खुर्च्यांची फेकाफेक करत पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करुन मारहाण केली. हा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि.4) रात्री कात्रज पोलीस चौकीत घडला आहे. या प्रकारानंतर संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली.
हर्षल बापूराव रोहिले (वय-21 रा. शरदनगर, चिखली, पुणे) असे गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वाहतूक विभागातील पोलीस शिपाई गणेश सर्जेराव नरुटे (वय-32) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश नरुटे हे वाहतूक विभागात कार्यरत आहेत. शनिवारी रात्री ते कात्रज चौकात कर्तव्यावर होते. त्यावेळी त्यांना आरोपी हा हॉर्न वाजवून भरधाव वेगात कार चालवताना दिसला. त्यामुळे फिर्यादी यांनी त्याला गाडी थांबवण्यास सांगितले. मात्र त्याने गाडी न थांबवता तो तसाच पुढे निघून गेला. त्यानंतर इतर सहकाऱ्यांच्या मदतीने आरोपीची गाडी थांबवून त्याच्याकडे गाडीची कागदपत्रे मागितली. मात्र, आरोपीने कागदपत्रे न दाखवता तुम्हाला माझ्यावर कारवाई करण्याचा अधिकार नाही, मी तुम्हाला बघून घेईन, तू मला ओळखत नाही असे म्हणत वाहतूक पोलिसांच्या अंगावर धावून गेला.
याप्रकारानंतर पोलिसांनी त्याला कात्रज पोलीस चौकीत आणले असता त्याने चौकीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसेच चौकीमधील खुर्च्यांची फेकाफेक करीत वर्दीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक गौरव देव यांच्या अंगावर धावून गेला. त्यांची गचांडी पकडून त्यांना हाताने मारहाण करत अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि सरकारी कामात अडथळा आणला. तरुणाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.














