चतु:श्रृंगी पोलिसांत गुन्हा : पुण्यातील पाषाण परिसरात घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : फिरायला बाहेर गेलेल्या एका ज्येष्ठ दाम्पत्याला पोलीस असल्याचे सांगून दोन चोरट्यांनी महिलेच्या अंगावरील दागिने पिशवीत काढून ठेवण्यास सांगून हातचलाखीने २ लाख ६० हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. हा प्रकार सूस रोडवरील वरदाहिनी सोसायटीजवळ शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता घडला.
याप्रकरणी पाषाण येथील एका ७२ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी हे आपल्या पत्नीसह फिरायला गेले होते. त्यावेळी दोघे जण त्यांच्याजवळ आले व त्यांनी हिंदीमध्ये पोलीस असल्याची बतावणी केली. या ठिकाणी एका सिनिअर सिटीझनचे सोने लुटले आहे. आम्ही तुम्हाला सतर्क करतोय, असे सांगून विश्वासात घेतले. त्यांना अंगावरचे दागिने पिशवीत ठेवायला सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी यांच्या पत्नीने अंगावर २ लाख ६० हजार रुपयांचे ११० ग्रॅम वजनाचे दागिने काढून पिशवीत ठेवले. फिर्यादी यांनी ती पिशवी आरोपीकडे दिल्यावर ते दोघे दागिने असलेली पिशवी घेऊन मोटारसायकल वरुन पळून गेले. पोलीस उपनिरीक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.
