भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : व्याजाचे पैसे न दिल्याने केला होता खून
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : एक महिन्याचे व्याजाचे पैसे न दिल्याच्या कारणावरुन एकावर वार करुन खून करुन फरार झालेल्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी माजलगाव (जि. बीड) येथून जेरबंद केले.
प्रकाश शिंदे आणि किसन उफाडे अशी त्यांची नावे आहेत. शनिवारी रात्री या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना पुण्यात आणण्यात आले आहे.
शरद शिवाजी आवारे (वय ४३, रा. संभाजीनगर, धनकवडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. हा प्रकार २८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आंबेगाव बुद्रुक येथील कात्रज ते नवले ब्रीजकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर चक्रधर एंटरप्रायजेससमोर घडला होता. या प्रकरणी त्याचा मित्र प्रशांत महादेव कदम (वय ३७, रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे.
शरद आवारे याने प्रकाश शिंदे याच्याकडून कर्जाऊ पैसे घेतले होते. त्याचे तो नियमित व्याज देत होता. मात्र, नोव्हेंबर महिन्याचे व्याज त्याने दिले नव्हते. त्यामुळे प्रकाश शिंदे याने शरद आवारे याला चंद्रसखा वेअर हाऊसजवळ बोलावले होते. त्याप्रमाणे शरद आवारे हा गेला असताना पैसे देण्यावरुन त्यांच्यात वाद झाला. तेव्हा प्रकाश शिंदे व किसन उफाडे यांनी त्याच्यावर वार करुन त्याचा खून केला होता. त्यानंतर ते पळून गेले होते. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे तपास पथक या दोघांचा शोध घेत असताना दोघेही बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तपास पथक तातडीने माजलगावला गेले व त्यांनी दोघांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
