भारती विद्यापीठ पोलिसांत गुन्हा : कात्रज परिसरातील घटनेने शहर हादरले
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याची भरदिवास गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना आज सोमवारी घडली आहे. भरदिवसा पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे पुणे शहर हादरुन गेले आहे. ही घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भारती विद्यापीठ पोलिस चौकीपासून हकेच्या अंतरावर दुपारी 12 च्या सुमारास घडली. चंद्रभागा वाईन्सजवळ ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अति वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
समीर मनूर शेख (वय 28, रा. फालेनगर, भारती विद्यापीठ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, तो काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली असून, वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.
पोलिसांनी सांगितले की, दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी समीर मुनीर यांच्यावर 6 गोळ्या झाडल्या आहेत. यामध्ये गंभीर जखमी होऊन समीरचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह पुढील तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समीर हा चहा पिण्यासाठी चौकात आला होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी समीरवर सहा गोळ्या झाडल्या. यामध्ये समीरचा जागीच मृत्यू झाला. समीर हे काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा मतदार संघाचे पदाधीकारी होते. आंबेगाव परिसरातील दत्तनगरमध्ये पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार संजय जगताप यांच्या हस्ते नुकतेच जन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. या घटनेमुळं परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मनूर कन्स्ट्रक्शन नावाने समीर हा बिझनेस देखील करत होता अशी माहिती समोर आली आहे.














