गोव्यातील कारचालकाचे बाणेर पोलिसांशी असभ्य वर्तन : १४ हजार ५०० रुपयांचा दंड
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गोव्यातील एका कारचालकाने दारू पिल्यानंतर पत्नीशी वाद घातल्याने तिने मदतीसाठी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून मदत मागितली. त्यानंतर “तू माझी तक्रार पोलिसांना का केली, मीच तुला पोलीस स्टेशनला घेऊन जातो,” असे म्हणत आरोपीने दारूच्या नशेत पत्नीला कारमध्ये बसवून भरधाव व निष्काळजीपणे कार चालवत बाणेर पोलीस ठाण्यात नेले. तेथेही पोलिसांशी असभ्य वर्तन करणाऱ्या कारचालकाला न्यायालयाने चांगलाच धडा शिकवला. प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकारी शिंदे यांनी त्याला १४ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
अजय पांडुरंग शेतगावकर (वय ४१, रा. अल्टो दाबोलीन, दक्षिण गोवा) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना बालेवाडी येथील चाकणकर मळा येथील हॉटेल आरंभ एक्झोटिया ते बाणेर पोलीस ठाणे या दरम्यान २ मार्च २०२६ रोजी पहाटे चार वाजता घडली.
याबाबत पोलीस अंमलदार निलेश बेलदार यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हा गोव्याचा रहिवासी आहे. निलेश बेलदार व अशोक नंनवरे हे २ मार्च रोजी मार्शल ड्युटीवर होते. पहाटे चार वाजता त्यांना पोलीस नियंत्रण कक्षातून कॉल प्राप्त झाला.
कॉल करणाऱ्या महिलेने सांगितले की, तिच्या पतीने शिवीगाळ केली असून त्याचे कुठेतरी एका महिलेसोबत संबंध आहेत. तो सध्या दारू पित बसला आहे आणि तिला मारहाण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मदत पाठवावी, असा संदेश मिळाला.
या कॉलनंतर बेलदार व अशोक नंनवरे हे हॉटेल आरंभ एक्झोटिया येथे पोहोचले. तेथे अजय शेतगावकर हा पत्नीला शिवीगाळ करत होता आणि तो मोठ्या प्रमाणावर दारूच्या अंमलाखाली होता. पोलिसांनी मदतीसाठी आलो असल्याचे सांगितले असता त्याच्या पत्नीने सांगितले की, अजय शेतगावकर दारूच्या नशेत शिवीगाळ करत असून त्याने तिला हाताने मारहाण केली आहे.
त्यावर अजय शेतगावकर पत्नीला म्हणाला, “तू पोलिसांना का बोलावले? मी पोलिसांना घाबरत नाही. मी स्वतः तुला पोलीस स्टेशनला नेतो.” असे म्हणत त्याने पत्नीला कारमध्ये बसवले आणि दारूच्या नशेत भरधाव कार चालवत बाणेर पोलीस ठाण्यात आणले.
पोलीस ठाण्यातही त्याने जोरजोरात ओरडून असभ्य वर्तन केले. पोलिसांनी गाडीची कागदपत्रे विचारली असता त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे नसल्याचे सांगितले. तसेच “तुम्हा पोलिसांकडून काय होईल ते करून घ्या, मी तुम्हाला उद्या दाखवतो मी कोण आहे,” असे म्हणत तो ओरडत होता.
सहायक पोलीस निरीक्षक कैलास डाबेराव यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक गोरक्षनाथ काळे, पोलीस हवालदार अशोक वणवे आणि पोलीस अंमलदार प्रमिला सहाणे यांनी आरोपीची औंध येथील रुग्णालयात दारू पिल्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला बाणेर पोलीस ठाण्यात आणले.
पोलिसांनी अजय शेतगावकर याच्याविरुद्ध भा. न्या. सं. कलम २८१, २९०, २९३ तसेच मोटार वाहन अधिनियम कलम १८५, १३० (१)(२) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११०, ११२, ११७ अन्वये गुन्हा दाखल केला.
पोलीस अंमलदार संतोष केंद्रे यांनी या गुन्ह्याचा तपास करून एकाच दिवसात दोषारोपपत्र तयार करून न्यायालयात सादर केले. या प्रकरणात सरकारी अभियोक्ता शैलजा घोडेस्वार यांनी कामकाज पाहिले, तर कोर्ट पैरवीसाठी पोलीस अंमलदार सोनवणे यांनी सहाय्य केले. न्यायालयाने अजय शेतगावकर याला १४ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त चुलुमुला रजनीकांत, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या सूचनांनुसार सहायक पोलीस निरीक्षक के. बी. डाबेराव, गणेश रायकर, पोलीस उपनिरीक्षक गोरक्षनाथ काळे, पोलीस अंमलदार किशन शिंगे, अशोक वणवे, रोहित पाथरुट, निलेश बेलदार, अशोक नंनवरे आणि प्रमिला सहाणे यांनी केली.
















