नाकाबंदीत पकडलेल्या टोळीकडून २०२४ पासूनच्या २० दुचाकी जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : वाहतूक नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी उत्तमनगर येथे लावलेल्या नाकाबंदीत विनानंबर प्लेट दुचाकी वापरणारा अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात सापडला. त्यावरून उत्तमनगर पोलिसांनी त्याच्या साथीदाराला पकडून २०२४ पासूनचे तब्बल १४ गुन्हे उघडकीस आणत २० दुचाकी जप्त केल्या आहेत.
महेश हनुमानसिंग राजपूत (वय २३, रा. एनडीए पोलीस चौकीमागे, उत्तमनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. आपण फायनान्स कंपनीत कामाला असल्याचे सांगून फायनान्स कंपनीने जप्त केलेल्या गाड्या असल्याचे भासवून ते चोरीच्या गाड्या विक्री करत असत.
उत्तमनगर पोलिसांनी कोथरूड, उत्तमनगर, बावधन, पुणे ग्रामीण आणि राजगड परिसरातून २० दुचाकी जप्त केल्या असून त्यापैकी १४ गुन्हे उघडकीस आणले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली होती.
यावेळी नंबर प्लेट नसलेली दुचाकी चालविणाऱ्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ही दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली. ही दुचाकी उत्तमनगरमधून चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल होता. पुढील चौकशीत त्या अल्पवयीन मुलाने महेश राजपूत व त्याच्या मित्रासोबत ही चोरी केल्याचे सांगितले.
यानंतर पोलिसांनी शोध घेऊन खडकवासला येथून २६ फेब्रुवारी रोजी महेश राजपूत याला मोटारसायकलसह पकडले. त्याच्याकडील स्प्लेंडर प्लस ही मोटारसायकल चोरीची असून तिची नंबर प्लेट बनावट असल्याचे आढळले.
ही मोटारसायकल कोथरूडमधून चोरीला गेल्याचे समोर आले. पुढील चौकशीत त्याने पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरातून २० दुचाकी चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक चेतन धनवडे, मुकेश कुरेवाड, राजनारायण देशमुख, पोलीस अंमलदार प्रदीप शेलार, पृथ्वीराज गायकवाड, चेतन बराटे, परमेश्वर पाडळे, अजय पवार, ज्ञानेश्वर तोडकर आणि अनिरुद्ध गायकवाड यांनी केली.
फायनान्स कंपनीचे नाव सांगून दुचाकींची विक्री
आपण फायनान्स कंपनीत काम करत असून कंपनीने जप्त केलेल्या या दुचाकी असल्याचे सांगून ते चोरीच्या दुचाकी विकत असत. विक्रीतून मिळालेल्या पैशांतून ते मौजमजा करत असत. कोथरूड पोलीस ठाण्यातील ४, उत्तमनगर, वारजे आणि बावधन येथील प्रत्येकी २, तर भारती विद्यापीठ, सिंहगड रोड, नांदेड सिटी आणि राजगड येथील प्रत्येकी १ असे एकूण १४ गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून सुमारे १५ लाख रुपयांच्या २० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.















