कोथरूड पोलिसांत फिर्याद : पुण्यातील सारस्वत बँकेच्या चेअरमन गौतम ठाकूर यांचा समावेश
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : बँकेच्या चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक व इतरांनी संगनमत करुन परस्पर कंपनीचे बनावट कर्ज खाते काढले. हे कंपनीचेच कर्ज खाते आहे असे भासवून ते खाते झाल्याचे जाहीर करुन कंपनीची मालमत्ता हडप करण्याचा तसेच सुरक्षा (तारण) म्हणून दिलेल्या धनादेशाद्वारे अडीच कोटी रुपयांची फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी सारस्वत बँकेच्या चेअरमनपासून व्यवस्थापकीय संचालक, झोनल व्यवस्थापकासह 8 जणांवर कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने सीआरपीसी कलम 156 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर सदरील गुन्हा दाखल झालेला आहे. सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम एकनाथ ठाकूर (रा. एकनाथ ठाकूर भवन, प्रभादेवी), व्यवस्थापकीय संचालक स्मिता संधाने, वसुली अधिकारी आनंद चाळके, झोनल व्यवस्थापक पल्लवी साळी (रा. चिंचवड), शाखा व्यवस्थापक अभिषेक भगत (रा. विश्रांतवाडी), झोनल व्यवस्थापक रत्नाकर प्रभाकर (रा. एरंडवणा) व इतर अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी स्मिता समीर पाटील (रा. कोथरुड) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 23 ऑगस्ट 2018 ते 10 जानेवारी 2020 दरम्यान घडला.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांच्या कंपनीचे सारस्वत बँकेच्या विश्रांतवाडी शाखेत टर्म लोनचे खाते आहे. असे असताना बँकेचे चेअरमन, व्यवस्थापकीय संचालक व इतरांनी संगनमत करुन फिर्यादीच्या कंपनीच्या नावाने खोटे व बनावट कर्ज खाते कंपनीच्या संमतीशिवाय काढले. ते खाते हे कंपनीचेच कर्ज खाते आहे, असे भासवले. फिर्यादी कंपनीचे माजी संचालक व जामीनदार यांना 23 ऑगस्ट 2018 रोजी 13 कोटी रुपयांचे वन टाईम सेटलमेंट प्रस्ताव दिला. कंपनीने त्यांच्या टर्म लोनच्या अधिकृत खात्यासाठी सुरक्षा म्हणून विना तारखेचे 6 धनादेश दिले होते. त्यातील एका धनादेशावर दीड कोटी रुपये व बँकेच्या अधिकृत कर्ज खात्यावर भरण्याकरीता दिलेल्या धनादेशावर 1 कोटी रुपये एवढी रक्कम लिहून कंपनीच्या नावाने काढलेल्या खोट्या व बनावट कर्ज खात्यावर भरले. त्या रक्कमेचा आरोपींनी स्वत:चे आर्थिक फायद्यासाठी वापर करुन फिर्यादीच्या कंपनीची अडीच कोटी रुपयांची फसवणूक केली.
बँकेने असे गैरकृत्य करुन बँक व्यवसायिक म्हणून स्वत:चे कर्तव्य पार न पाडता आरोपींनी फिर्यादी कंपनीने शेअर्सच्या सुरक्षापोटी दिलेले विना तारखेच्या धनादेशावर फिर्यादीच्या संमतीशिवाय परस्पर आरोपींनी तारीख नमूद करुन त्याचा गैरवापर केला. फिर्यादीची कंपनी बँकेचे कर्ज रक्कम नियमित भरत असताना कर्ज रक्कम भरत नाही असे दाखवून फिर्यादी कंपनीची कर्ज खाती एनपीए झाल्याचे घोषित करुन फिर्यादी कंपनीच्या व आजी माजी संचालक व जमीनदार यांच्या वैयक्तिक मालकीच्या मालमत्ता जाणीवपूर्वक हडप करण्याचा प्रयत्न केला, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयाने १५६ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करुन तपास करण्याचा आदेश कोथरुड पोलिसांना दिला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप अधिक तपास करीत आहेत.
