गुन्हे शाखा युनिट-२ची कारवाई : ८१ लाखांचा मुद्देमाल केला जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्यास जेरबंद करून ८१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखा युनिट-२च्या पथकाने पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊर फाटा चौकात ही कारवाई केली.
प्रवीण दुर्योधन जाधव (वय २६, रा. मु.पो. गुरसाळे, ता. खटाव, जि. सातारा) असे अटक केलेल्याचे नाव असून, अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हे शाखा युनिट-२चे पथकातील अधिकारी-कर्मचारी गस्तीवर होते, त्यावेळी पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊर फाटा चौक येथे आयशर ट्रकमध्ये गुटखा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सापळा रचून ट्रक ताब्यात घेऊन तपास केला. त्यावेळी ट्रकमध्ये १५० गोण्या गुटखा मिळून आला. चार हजार किलो ५६ लाख ४८ हजार ८२० रुपये किमतीचा गुटखा आणि आयशर ट्रक २४ लाख ५० हजार रुपये असा एकूण ८० लाख ९८ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हा माल बाजारामध्ये दुप्पट किमतीने विकला जात असल्याचे निदर्शनास आले.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास गाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर टेंगले, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर व ज्योती काळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
