चतुर्श्रुंगी पोलिसांत फिर्याद : एका कंपनीचा संचालक असल्याचे सांगून घातली भुरळ
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यातील एका 45 वर्षीय वकील महिलेसोबत फेसबुकवर ओळख झाल्यानंतर प्रेमसंबंधाचे नाटक करत तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. एका कंपनीचा संचालक असल्याचे भासवून या महिलेला भुरळ पाडली. वकिल महिलेला गंडा घातल्याच्या घटनेने वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. 2017 ते 2022 हा प्रकार घडला.
पीडित महिलेने टोनी थॉमस याच्याविरुद्ध चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिला पेशाने वकील आहेत. पुण्यातील औंध परिसरात त्या राहतात. आरोपी आणि फिर्यादीची एका क्लबमध्ये ओळख झाली होती. त्यानंतर 2016 साली आरोपीने या महिलेला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर आरोपीने फेसबुक वर मेसेज करून बाणेरमधील ऑफिसमध्ये या महिलेला भेटायला बोलावले. या भेटीत त्याने सिंद्रिया बिझनेस सोल्युशन नावाची कंपनी सुरू केल्याचे सांगितले. या कंपनीकडून क्लिअर इस्टेट नावाचा प्रकल्प केला जात असून त्यात गुंतवणूक करण्यास फिर्यादीला भाग पाडले. फिर्यादीने यानंतर 1 कोटी 62 लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर काही काळाने त्यांच्यात वाद झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे या फिर्यादी महिलेच्या लक्षात आले. त्यानंतर वकिल महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
