सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद : धायरीतील पंचरत्न क्लासिक सोसायटीतील घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : प्रेमविवाहानंतर सातत्याने त्रास देत असल्याने माहेरी आलेल्या व मोबाईल ब्लॉक केल्याने चारित्र्याचा संशय घेऊन सराईत गुंडाने आपल्या पत्नीवर चाकूने पोटात वार करुन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. बहिणीला वाचविण्यासाठी गेलेल्या मेव्हण्यावरही त्याने वार करुन जखमी केले आहे. धायरीमधील पंचरत्न क्लासिक सोसायटीत रविवारी सकाळी हा प्रकार घडला.
याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी सचिन ज्ञानोबा आमले (वय ३०, रा. आमलेवाडी, घोटवडे, ता. मुळशी) याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, पिडीत महिला व सचिन आमले यांचा ५ वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला आहे. त्यांना दोन मुलेही आहेत. लग्नानंतर दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. या कारणावरुन गेल्या दोन महिन्यांपूर्वी पिडीत महिला माहेरी राहायला आली. मोबाईलवरुनही तो वाद घालत असल्याने तिने त्याला ब्लॉक केले होते. सचिन रविवारी सकाळी साडेदहा वाजता धायरी येथे तिच्या माहेरी आला होता. मला तू मोबाईलवर ब्लॉक का केले असे विचारुन आता तुला जिवंत ठेवणार नाही, असे म्हणत त्याने धारदार चाकूने पिडीत महिलेच्या मानेवर, दोन्ही हातांवर (दंडावर), बोटांवर सपासप वार केले. आरडाओरडा ऐकून तिचा भाऊ तिला वाचविण्यासाठी मध्ये आला असता त्याने ओम तलाठी याच्या हातावर चाकूने वार करुन जखमी केले. दोघांनी आरडाओरडा सुरु केल्यावर तो पळून गेला. दोघांवर उपचार करण्यात आले असून सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक तनपुरे अधिक तपास करीत आहेत.
