कोंढवा पोलिसांत फिर्याद : सुपरवायझरसोबत भांडण न केल्याच्या रागातून पतीने केले कृत्य
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : पत्नीने सुपरवायझरबरोबर भांडण केले नाही म्हणून चौथ्या मजल्यावरून ढकलून देणाऱ्या पतीला कोंढवा पोलिसांनी जेरबंद केले. हा प्रकार शनिवारी (दि. २२ जानेवारी २०२२) दुपारी घडला आहे. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
नितीन दशरथ दहिरे (वय-32) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात 25 वर्षीय पत्नीने तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरामध्ये एका निर्माणधीन इमारतीत फिर्यादी या पतीसोबत राहतात. या ठिकाणी लाईट फिटिंगचे काम सुरु आहे. काही दिवसांपूर्वी नितीन दहिरे याचे लाईट फिटिंग करण्यासाठी आलेल्या सुपरवायझर सोबत भांडण झाले होते. त्यावेळी पत्नीने आपली बाजू घेऊन सुपरवायझर सोबत भांडण केले नसल्याचा राग त्याच्या मनात होता. याच कारणावरुन त्यांच्यामध्ये शनिवारी भांडण झाले. हे भांडण एवढे विकोपाला गेले की, पतीने रागाच्या भरात पत्नीला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
एवढेच नाही तर चौथ्या मजल्यावरुन लिफ्टसाठी सोडलेल्या मोकळ्या जागेतून खाली ढकलून दिले. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.
