पावणे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त : सामाजिक सुरक्षा विभाग आणि गुन्हे शाखेची कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : भारत (India) विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन बेटींग घेणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभाग आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून अटक करून 2 लाख 78 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि.23) खडकी येथील चंदन हॅन्डलुम्स या कापड दुकानात करण्यात आली.
पुनित चंदनमल जैन (वय-36 रा. फ्लॅट नं. 103, बी विंग, मेहता टॉवर्स, के.जे. रोड, खडकी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी विरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, रविवारी केपटाऊन येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या दोन संघामध्ये एकदिवसीय क्रिकेट सामना झाला. या सामन्यावर खडकी येथील चंदन हॅन्डलुम्स कपड्याच्या दुकानात ऑनलाइन बेटिंग सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणावरुन माहीती प्राप्त केली. त्यानंतर गुन्हे शाखा आणि सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकांनी छापा टाकला. त्यावेळी आरोपी पुनित जैन हा त्याच्या मोबाईल मधील व्हॉट्सॲपवर क्रिकेट मॅच व खेळीकडून बेटिंगची आकडेवारी घेताना आढळून आला. पोलिसांनी घेतलेल्या झडतीमध्ये 2 लाख 68 हजार रुपये रोख आणि 10 हजार रुपये किंमतीचे दोन मोबाईल असा एकूण 2 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने करीत आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, पोलीस नाईक माने, चव्हाण, कोळगे, गुन्हे शाखा युनिट-२चे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, पोलीस हवालदार जाधव, तारु, युनिट-4च्या महिला सहायक पोलीस निरीक्षक शोभा क्षीरसागर, पोलीस हवालदार शेख, कुवर, दरोडा व वाहन चोरी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक पडवी, खंडणी विरोधी पथक-2चे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली.
