दत्तवाडी पोलिसांची कामगिरी : दोन पिस्टल, दोन जिवंत काडतुसे केली जप्त
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : सिंहगड रोडवर पिस्टल बाळगणाऱ्यास दत्तवाडी पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून दोन पिस्टल, दोन जिवंत काडतुसे असा एकूण ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
चंद्रकांत ऊर्फ चंदू तुळशीराम माने (वय २०, रा. स्वप्नरूप सोसायटी, पारी कंपनीजवळ, नऱ्हे, पुणे. मूळ रा. साकोळा, ता. शिरूर, अनंतपाळ, जि. लातूर) असे अटक केलेल्याचे नाव असून, त्याच्यावर दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी सांगितले की, हडपसरमधील कुख्यात मयत गुन्हेगार सुजित वर्मा याचे स्टेटस सामाजिक माध्यमावर ठेवून मित्र व ओळखीच्या लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करीत असून, त्याने दत्तवाड पानमळा परिसरात मित्रांच्या भांडणामध्ये पिस्टल आणले होते. ती व्यक्ती सिंहगडरोडवरील वृंदावन नर्सरीच्याबाजूला थांबला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सापळा रचून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे दोन देशी बनावटीचे पिस्टल, दोन जिवंत काडतुसे असा एकूण ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. त्याच्यावर दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.
अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार, सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, चंद्रकांत कामठे, पोलीस हवालदार कुंदन शिंदे, राजू जाधव, पोलीस अंमलदार विष्णू सुतार, अमित सुर्वे, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर, अक्षयकुमार वाबळे, नवनाथ भोसले, भरत अस्मार, प्रमोद भोसले, शरद राऊत यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
