सहकारनगर पोलिसांत एकावर गुन्हा : धनकवडीतील स्मशानभूमी परिसरात घडली घटना
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : कपडे विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला अंगावर पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 7) पहाटेच्या सुमारास धनकवडी येथील स्मशानभूमी आवारात घडला आहे. याबाबत सहकारनगर पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरज विजय मरळ (वय २८, रा. जिवनधारानगर, धनकवडी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, त्यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गोविंदा उर्फ सत्येंद्र यादव (रा. गुजरवाडी, मांगडेवाडी, कात्रज) याच्याविरुद्ध भादवी कलम 307,504 नुसार गुन्हा दाखल करण्यात केला.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी सुरज मरळ आणि आरोपी हे एकमेकांच्या तोंड ओळखीचे आहेत. आरोपी सध्या गुजरवाडी येथे राहण्यास गेला आहे. फिर्यादी यांचा कपडे विक्रीचा व्यवसाय असून, ते घरातून हा व्यवसाय करतात. रविवारी (दि.6) ते व्यवसायातील पैसे गोळा करत असताना रात्री दहाच्या सुमारास आरोपी त्यांना भेटला. त्यानंतर दोघांनी एका ठिकाणी दारु पिली. त्यानंतर धनकवडी स्मशानभुमी या ठिकाणी जाऊन गप्पा मारत बसले होते.
दारूच्या नशेत आरोपीने फिर्यादी यांच्यासोबत वाद घालून शिवीगाळ केली. तसेच जवळ पडलेला सिमेंटचा ब्लॉक डोक्यात मारुन जखमी केले. सुरज यांनी त्यांच्या वडिलांच्या गाडीत भरण्यासाठी आणलेले पेट्रोल आरोपीने त्यांच्या अंगावर ओतून पेटवून देऊन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. सहकारनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक उमेश लोंढे पुढील तपास करीत आहेत.