समर्थ पोलिसांत फिर्याद : २५ वर्षे झाली तरी हस्तांतरण करून दिले नाही
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : गृहप्रकल्पाची जागा व इमारत सोसायटीच्या नावाने हस्तांतरण (कन्व्हेयन्स) करुन देणे बंधनकारक असतानाही 25 वर्षात ते करुन न देता फसवणूक करणाऱ्या तीन बांधकाम व्यावसायिकांवर समर्थ पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 15 डिसेंबर 1995 पासून आतापर्यंत घडला आहे.
पुरुषोत्तम विठ्ठलदास लड्डा, राजेंद्र मनसुख मंत्री आणि अशोक विठ्ठलदास बजाज (सर्व रा. व्हाईट हाऊस, सदाशिव पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हरकचंद देवीचंद जैन (वय 66, रा. विठ्ठल स्मृती गृहरचना संस्था, नाना पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, मेसर्स लड्डा, मंत्री आणि बजाज भागीदारी फर्मचे आरोपी तिघे भागीदार आहेत. त्यांनी विहित मुदतीत विठ्ठल स्मृती गृहरचना मर्यादित ही इमारत बांधली. गृहप्रकल्पाची जागा व इमारत संस्थेच्या नावाने हस्तांतरण (कन्व्हेयन्स) करणे बंधनकारक आहे. तरीसुद्धा अद्यापपर्यंत त्यांनी ते करुन दिले नाही. याबाबत फिर्यादी यांनी वेळोवेळी कल्पना दिली असता त्यांनी कन्व्हेयन्स डीड करुन देतो, असे सांगितले. परंतु, त्यांनी गृहरचना संस्था रजिस्टर झाल्यापासून आतापर्यंत कोणतेही डिड कन्व्हेयन्स करुन दिलेले नसून फिर्यादी व फिर्यादीच्या गृहरचना संस्थेची फसवणूक केली म्हणून गुन्हा नोंद केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक खोपडे तपास करीत आहेत.
