विमानतळ पोलिसांत फिर्याद : दागिने, पैशासाठी केला जात होता छळ
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : माहेरहून दागिने, पैसे घेऊन येण्यासाठी सासरी होणार्या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी पतीसह तिघांना अटक केली आहे.
पती सागर देविदास पंडीत (वय 22), सासू (वय 55) आणि नंणद (वय 37, सर्व रा. राजीवनगर, साऊथ विमाननगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
संजना मनीष त्रिभुवन (वय-19) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तिची आई योगिता मनिष त्रिभुवन (वय 40, रा. रेसकोर्स, वानवडी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी यांची मुलगी संजना आणि सागर पंडीत यांचा 14 जून 2021 रोजी विवाह झाला होता. सागर याला फिरण्यासाठी होंडा मोटारसायकल पाहिजे, तसेच त्याच्या हातामध्ये अंगठी, सोन्याची चैन अशा वस्तू पाहिजे, असे सांगून त्याकरीता तु तुझ्या आईवडिलांकडून पैसे घेऊन ये, अशी मागणी संजनाकडे केली जात होती. या कारणावरुन तिला वेळोवेळी मारहाण करुन छळ केला जात होता. या छळाला कंटाळून तिने सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक गांधले तपास करीत आहेत.
