पेट्रीशिया नारायण यांचा प्रेरणादायी प्रवास
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
चेन्नई : दारूड्या नवऱ्याचे घर सोडल्यानंतर जिने हातगाडीवर चहाची विक्री केली; ती आज आहे मोठ्या रेस्टॉरंटची मालकीण पेट्रीशिया नारायण यांचा प्रेरणादायी प्रवास जर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर तुम्ही कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाऊ शकता.
जिद्द व चिकाटीच्या जोरावर उशिरा का होईना; पण आपले ध्येय साध्य करता येते. याचेच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे चेन्नईच्या पॅट्रिशिया नारायण. पॅट्रिशिया यांची कहाणी कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता, संघर्ष व चिकाटी यांच्या जोरावर यश कसे साध्य करता येते याचे जिवंत उदाहरण आहे. पॅट्रिशिया नारायण यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घेऊ
कोण आहेत पॅट्रिशिया नारायण?
पॅट्रिशिया नारायण या चेन्नई येथील रहिवासी आहेत. त्या संदीपा रेस्टॉरंट चेनच्या संचालक आहेत. त्यांना २०१० मध्ये FICCI ‘आंत्रप्रेन्योर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रेस्टॉरंट व्यवसायाव्यतिरिक्त पॅट्रिशिया तमिळनाडूच्या आचरापक्कम येथून रुग्णवाहिका सेवादेखील पुरवतात.
वयाच्या १७ व्या वर्षी पॅट्रिशिया यांनी घरच्यांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. या विवाहामुळे पॅट्रिशिया यांच्या वडिलांनी त्यांच्याबरोबरचे नाते तोडून टाकले. मात्र, लग्नानंतर पॅट्रिशिया यांच्या नवऱ्याचा खरा चेहरा समोर आला. पॅट्रिशिया यांचे पती खूप दारू प्यायचे. दारू पिऊन अनेकदा त्यांनी पॅट्रिशिया यांना मारहाणही केली आहे. अखेर कंटाळून पॅट्रिशिया यांनी नवऱ्याबरोबरचे सगळे संबंध तोडून टाकले. पॅट्रिशिया यांना दोन मुले आहेत. या मुलांच्या उदरनिर्वाहासाठी सुरुवातीला त्यांनी चेन्नईच्या मरिना बीचवर हातगाडीवर चहा, कॉफी, कटलेट व जॅम विकायला सुरुवात केली. सुरुवातीला त्या ५० पैशांमध्ये चहा विकायच्या. पहिल्या दिवशी त्यांनी केवळ ५० रुपयांची कमाई केली होती.
व्यवसाय करताना पॅट्रिशिया यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला होता; मात्र त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांनी त्यांचा व्यवसाय सुरूच ठेवला. कालांतराने पॅट्रिशियाच्या व्यवसायाला गती मिळू लागली. पॅट्रिशिया यांच्या चिकाटी, मेहनतीमुळे त्यांना १९८४ मध्ये कॅन्टीन चालवण्याची संधी मिळाली. हळूहळू पॅट्रिशिया यांचा व्यवसाय वाढत गेला.
२००४ मध्ये पॅट्रिशिया यांना मोठा धक्का बसला. एका अपघातात त्यांची मुलगी आणि जावयाला जीव गमवावा लागला होता. मुलीच्या मृत्यूमुळे उद्ध्वस्त झालेल्या पॅट्रिशिया यांनी एक रेस्टॉरंट सुरू करण्याचा निर्णय घेतला २००६ मध्ये पॅट्रिशिया यांनी त्यांच्या मुलीच्या नावावर संदीपा हे रेस्टॉरंट सुरू केले आणि ते आपल्या स्वर्गवासी मुलीला समर्पित केले. त्यांचा रेस्टॉरंटचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत गेला. काही वर्षांनी संदीपा नावाच्या अनेक रेस्टॉरंट फ्रँचायजींची स्थापना झाली. दोन व्यक्तींच्या कार्ट व्यवसायाने आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या पॅट्रिशिया यांच्या रेस्टॉरंटमध्ये २०० हून अधिक कर्मचारी काम करतात.