नाट्य परिषदेची निवडणूक सुद्धा बिनविरोध व्हावी : उद्योगमंत्री उदय सामंत
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पिंपरी-चिंचवड : सांस्कृतिक चळवळीचा भाग म्हणून आपण जेव्हा नाटक, बालरंगभूमी यांच्याकडे पाहतो तेव्हा सगळ्यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून मिळून मिसळून काम केले पाहिजे. नाट्य परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ कलाकारांना अर्ज भरावा लागतो, हे थांबलं पाहिजे. अन् साहित्य संमेलना प्रमाणे नाट्य परिषदेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक देखील बिनविरोध व्हावी, अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्थ व उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली.
१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ सोहळा आज (दी. ५) सांस्कृतिक नगरी असलेल्या पुणे शहरातील गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे मोठ्या थाटात पार पडला. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, विश्वस्त मोहन जोशी,विश्वस्त अशोक हांडे, तहहयात विश्र्वस्त शशी प्रभू,९९ व्या अ. भा. म. नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, १०० व्या अ. भा. म. नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष जब्बार पटेल, माजी नाट्य संमेलनाध्यक्ष सुरेश खरे, दत्ता भगत, गंगाराम गवाणकर, अ. भा. म. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, अ. भा. म. नाट्य परिषद पुणे शाखा अध्यक्ष मेघराज राजेभोसले, पुणे महापालिका सह आयुक्त विकास ढाकणे, पोलिस आयुक्त रितेश कुमार आदी उपस्थित होते. यावेळी ९९ व्या अ. भा. म. नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमनंद गज्वी यांच्या हस्ते ज्येष्ठ कलाकार स्वरूप कुमार, लीला गांधी, सुहासिनी देशपांडे यांचा सन्मान करण्यात आले.
पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले, सांस्कृतिक चळवळीला गालबोट लागू नये, अशी आपल्या सर्वांची भूमिका असली पाहिजे. नाट्य परिषदेच्या नावाने होणारी भांडणे थांबली पाहिजेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही सर्व नाट्य परिषदेच्या शाखांची मातृ संस्था आहे. तिने सर्व शाखांना सोबत घेवून चालले पाहिजे.
९९ व्या अ. भा. म. नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी म्हणाले, कोरांनामुळे मधली काही वर्ष नाट्य संमेलन झाले नाहीत त्यामुळे गेली ५ वर्ष मी हे नाट्य संमेलनाध्यक्ष पद भूषावत आहे. उद्या मी माजी संमेलनाध्यक्ष होणार असलो तरी माणूस जीवनात कधीही माजी होत नाही. कलाकार वर्तमानात जगत असतो आणि भविष्याचा वेध घेत असतो. हे कलाकारांचे वैशिष्ठ्य आहे. नाट्य संमेलनाची ही वाटचाल पाहता आगामी काळात मराठी रंगभूमी ही भारतीय रंगभूमीचे प्रतिनिधीत्व करेल, असा विश्वास देखील गज्वी यांनी व्यक्त केली.
प्रशांत दामले म्हणाले, मराठी रंगभूमी ही तीन गोष्टींवर उभी आहे. पायाभूत सुविधा जे शासन आपल्याला पुरवत आहे. कलाकारांचा उत्तम अभिनय आणि नाट्य रासिकांचा नाटकांना मिळणारा प्रतिसाद. हे १०० वे नाट्य संमेलन तब्बल ५ महीने चालणार आहे. ज्याचा शुभारंभ सोहळा आज पार पडला तर समारोप हा मे महिन्यात रत्नागिरीमध्ये होणार आहे. त्यामुळे राज्यभर या नाट्य संमेलनाचा जागर होणार आहे. पण जेव्हा नाट्य परिषद ही खेडापाड्यात, जिल्ह्यात राज्यात पोहोचेल तेव्हाच ती खऱ्या अर्थाने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद होईल. मेघराज राजेभोसले म्हणाले, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची पहिली शाखा ही पुण्यात सुरू झाली. अन् आज १०० व्या अ. भा. म. नाट्य संमेलनाच्या विभागीय संमेलनाची सुरूवात देखील याच सांस्कृतिक नगरीमध्ये होतीये याचा आम्हाला खूप आनंद आहे. पूर्वी नाट्य संमेलन हे एक किंवा दोन दिवसाचे असायचे मात्र यंदा राज्यभर १०० वे नाट्य संमेलन साजरे होणार आहे. अर्थात हे शासनाने ९ कोटी ३३ लाख निधी दिल्यानेच शक्य झाले आहे. यातील निम्मा निधी हा नाट्य संमेलनासाठी खर्च होणार आहे. तर उर्वरीत निधी हा कलाकारांच्या हितासाठी खर्च केला जाणार आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले आणि आभार दीपक रेगे यांनी मानले.
