महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : माजी मंत्री दिलीप सोपल व आर्यन सोपल यांच्या वाढदिवसानिमित्त आझाद ग्रुप व अनिल मालक प्रतिष्ठानच्यावतीने क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते.
१२ ते १४ जानेवारीदरम्यान शहरातील आर.के क्लब येथील टर्फ गार्डनवर ही क्रिकेट स्पर्धा पार पडली. ८ संघांच्या झालेल्या चुरशीच्या सामन्यातून सातारकर टायटन्स आणि युनिकॉर्न क्रिकेट क्लबने अंतिम फेरी गाठली होती. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात सातारकर टायटन्सने विजय मिळवत एपीएल चॅम्पियन ट्रॉफी पटकावली.
इंडस्ट्री इस्टेटचे चेअरमन सुधीर सोपल यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ झाला. माजी नगराध्यक्ष योगेश सोपल हे स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित होते. अंतिम सामन्याला खासदार ओमराजे निंबाळकर व माजी मंत्री दिलीस सोपल यांनी हजेरी लावली. दोन्ही नेत्यांनी मैदानावर उतरुन फलंदाजी अन् यष्टीरक्षकाचीही भूमिका निभावली.
यावेळी त्यांनी स्पर्धेचे आयोजक लखन राजपूत यांच्यासह त्यांच्या टीमचे उत्कृष्ट नियोजनबद्दल कौतुक केले. विजयी संघाचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या. स्पर्धेत एकूण ८ संघांनी सहभाग घेतला होता. क्वालिफायर १ मध्ये युनिकॉर्न क्रिकेट क्लब आणि सातारकर यांच्यात लढत झाली. तर, क्वालिफायर २ मध्ये आशापुरक क्रिकेट क्लब आणि सातारकर टायटन्समध्ये सामना रंगला. त्यामध्ये, विजयी संघानी अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत सातारकर टायटन्स आणि युनिकॉर्न क्रिकेट क्लब यांच्यात रोमांचक लढत झाली. या लढतीत सातारकर क्रिकेट क्लबने विजय मिळवत आझाद प्रिमियर लीगचे चॅम्पियनपद जिंकले. स्पर्धेतील प्रथम विजेत्या सातारकर टायटन्स संघास प्रथम पारितोषिक ३५,०७४ रुपये व ट्रॉफी देण्यात आले. उपविजेत्या युनिकॉर्न क्रिकेट क्लबला द्वितीय पारितोषिक २५,०७४ रुपये व ट्रॉफी देण्यात आली. तर, आशापुरक क्रिकेट क्लबला तृतीय पारितोषिक १५,०७४ रुपये आणि ट्रॉफी देण्यात आली.
स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सरिज व उत्कृष्ट खेळाडूंनाही विशेष बक्षीस देऊन गौरविण्यात आले.