नामांकीत कंपनीच्या मोबाईल बिलाचा दुरुपयोग : शिवाजीनगर पोलीसांची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : उच्च शिक्षीत चोराने १७ मोबाईल चोरी करुन ते विक्री करण्यासाठी नामांकीत कंपनीच्या मोबाईल बिलाचा दुरुपयोग करणाऱ्या चोरास जेरबंद करण्यात आले आहे. शिवाजीनगर पोलीसांनी ही कारवाई केली आहे. ओमकार बत्तुल (वय २२ वर्षे रा. नानापेठ) याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीने गुन्ह्यातील विक्री केलेला मोबाईल व इतर अशा प्रकारे चोरी केलेले एकुण १७ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
फिर्यादी हे शिवाजीनगर जुना तोफखाना भागातील त्यांच्या स्वतःच्या फर्निचरच्या दुकानात कामात व्यस्त असताना त्यांचा काउंटरवर ठेवलेला सॅमसंग कंपनीचा असलेला मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केला. याविरोधात फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोबाईल चोरांना प्रतिबंध करण्याकरीता व चोरीस गेलेले मोबाईल शोधण्याकरीता आदेश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने चोरीला गेलेल्या मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषण व मिळालेल्या माहितीनुसार सपोनि बाजीराव नाईक व पोलीस अंमलदार रुपेश वाघमारे, आदेश चलवादी, रुचिका जमदाडे यांनी शिवाजीनगर भागात सापळा लावून आरोपीस ताब्यात घेतले. त्याची कसुन चौकशी केली असता त्याने हा मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडे केलेल्या सखोल तपासामध्ये तो नामांकीत इलेक्ट्रॉनिक वस्तुविक्री करणाऱ्या कंपनीच्या मोबाईल मुळे बिलाच्या पीडीएफ मध्ये चोरी केलेल्या मोबाईलचे डिटेल्स एडिट करत असे. त्याची पीडीएफ तयार करुन तो चोरी केलेला मोबाईल स्वतःचा असल्याचे भासवुन मोबाईल दुकानदारास बनावट बिलाची पीडीएफ व स्वतःच्या आधार कार्डच्या आधारे विक्री केली असल्याचे भासवत असे. असे तपासात निष्पन्न झाल्याने त्याच्यावर गुन्ह्या दाखल करण्यात आला आहे. तसेच जप्त करण्यात आलेल्या इतर मोबाईल संदर्भात तपास चालु आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ १, संदिपसिंह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग वसंत कुंवर, यांनी पार पाडली.
पुणे शहर पोलीसांकडुन आवाहन करण्यात आले आहे की, मोबाईल खरेदी-विक्री करणा-या व्यापा-यांनी जुने वापरलेले मोबाईल खरेदी-विक्री करताना मोबाईल बिलाची पडताळणी करुन मगच व्यवहार करावे.
