अंकिता ताकभाते राज्यात महिलांमध्ये तिसरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या लागलेल्या निकालात यंदाही बार्शीची सरशी पाहायला मिळाली.
बार्शी तालुक्यातील तरुणाईनेही यंदाच्या स्पर्धा परीक्षेतून यश संपादन केलं आहे. तालुक्यातील सासुरे गावची अंकिता विकास ताकभाते हिने उपजिल्हाधिकारीपदाला गवसणी घातली. अंकिताने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात १४६ वी तर महिलावर्गात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन यश मिळवले आहे. अंकिताचे वडिल हे साखर कारखान्यातील कामगार असून कुमठे येथील श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्यात ते गेली अनेक वर्षे कामगार म्हणून कार्यरत आहेत. अंकिता ताकभाते ही महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन उपजिल्हाधिकारी झाल्यामुळे आई-वडिलांच्या कष्टाचं तिने चीज केल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. अंकिताच्या या यशाबद्दल खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही तिचे अभिनंदन केले आहे. तसेच तिच्या या यशाबद्दल सर्वच स्तरावरून तिचं कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.