पी.सी.बी. गुन्हे शाखेचा दणका
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : भारती विद्यापीठ पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या, आदित्य उर्फ सोन्या कांबळे या अट्टल गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पी.सी.बी. गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
आदित्य उर्फ सोन्या कांबळे, (वय २० वर्षे, रा.रुम नं.६, लेन नं.२, साईमंदीराजवळ हनुमाननगर जाभुळवाडी रोड आंबेगाव खुर्द) याला ताब्यात घेण्यात आले आहे. चंद्रपुर मध्यवर्ती कारागृह, चंद्रपुर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश देण्यात आले आहेत. पुणे पोलीस आयुक्तालयातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हे करणारा हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह भारती विद्यापीठ, येरवडा व विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत लोखंडी कोयता, तलवार या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह जबरी चोरी, पळवुन नेणे, बेकायदाशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील ५ वर्षामध्ये त्याच्याविरूध्द ७ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीवाचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करायला घाबरत होते. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन दशरथ पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा, चंद्रकांत बेदरे, यांच्या आधिपत्याखाली पोलीस अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी पार पाडली. स्थानबध्दतेची ही ९९ वी कारवाई आहे.