पी.सी.बी. गुन्हे शाखेची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : वानवडी पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या अमन शेख या गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पी.सी.बी. गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
अमन शेख (वय.२२ रा. स.न. १०८/१०९ आनंदनगर रामटेकडी हडपसर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याला नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश देण्यात आले आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हे करणारा हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोयता, चाकु, तलवार यासारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, दरोडा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. त्याच्याविरूध्द मागील ३ वर्षात ३ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्याच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वानवडी पोलीस स्टेशन संजय पतंगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखेचे चंद्रकांत बेदरे यांनी पार पाडली. स्थानबध्दतेची ही ९८ कारवाई आहे.