सहकारनगर पोलीसांची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : पिडीत मुलीचा अश्लील व्हिडीओ सोशल मिडियावर प्रसारीत करणाऱ्या आरोपीस गोवा राज्यातून सहकारनगर पोलीसांनी जेरबंद केले आहे.
विनय शेकापुरे (वय २३ वर्ष रा. गणेश कृपा, नालंदा कॉलनी, मिरमार पणजी गोवा मुळ रा.मु. पो. मुखेड ता. मुखेड, जि. नांदेड) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
त्याने तक्रारदार पिडीत मुलगी हिला अश्लील व्हिडीओ कॉल करण्यास भाग पाडुन तो व्हिडीओ कॉल रेकॉर्ड केला होता. त्यानंतर त्यांचा ब्रेकअप झाल्याने त्याचा राग मनात धरुन हा व्हिडीओ फेक इन्स्टाग्राम आयडी बनवुन तसेच युट्युबवर लिंक बनवुन अश्लील व्हिडीओ सोशल मिडियावर प्रसारीत केला.
पिडीत मुलीने या विरोधात फिर्याद दिली. सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
या गुन्हयाचा तपास करीत असताना पिडीत मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे हा व्हिडीओ कोणी प्रसारीत केला त्याबाबत काही माहिती नव्हती. तसेच आरोपीचा कोणताही ठाव ठिकाणा नसताना तांत्रिक विश्लेषण करुन माहिती मिळविण्यात आली. संशयीत आरोपी हा गोवा राज्यात पणजी येथे कोणत्यातरी पंचतारांकित हॉटेल मध्ये नोकरीस असल्याबाबत माहिती मिळाली. परंतु कोणत्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आहे त्याची माहिती मिळाली नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेण्यासाठी सहकारनगर पोलीस स्टेशन कडील सहायक पोलीस फौजदार सोपान नावडकर, पोलीस अंमलदार अमोल पवार, निलेश शिवतरे, सागर सुतकर, निखील राजीवडे यांनी वरिष्ठांच्या परवानगीने गोवा राज्यामधील पणजी येथे जाऊन आरोपीचा वेगवेगळ्या पंचतारांकित हॉटेल मध्ये ४ दिवसांपासुन शोध घेत होते. तेव्हा आरोपी हा ज्या पंचतारांकित हॉटेल मध्ये कामाला होता त्याबाबत माहिती मिळवुन या हॉटेलच्या बाहेर सापळा रचुन संशयीत आरोपी हा हॉटेलमधील काम संपवुन घरी जाण्यासाठी हॉटेलच्या बाहेर आला असता त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याने पिडीत मुलीचा इन्स्टाग्राम व युट्युबवर अश्लील व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर केल्याबाबत कबुली दिली. या आरोपीस गोवा राज्यातुन सहकारनगर पोलीस स्टेशन येथे आणुन दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कस्टडी दिली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे हे करीत आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-२, स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग नंदिणी वग्यांनी, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल खंडाळे यांनी केली आहे.