आचार्य डॉ. लोकेश मुनीजी यांचे प्रतिपादन; सूर्यदत्त जीवनगौरव व राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण.
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : “त्यागी, तपस्वी, बलिदानी व समर्पित भावनेने योगदान देणारी प्रतिभावंत व्यक्तिमत्त्वेच इतिहास घडवतात. रौप्यमहोत्सवी वर्षात ‘सूर्यदत्त’ने सन्मानित केलेली ही रत्ने आदर्शवत आहेत.
हा सन्मान सोहळा प्रेरक असून, यातून भविष्यातील चांगला नागरिक घडवण्याचे कार्य होत आहे. देशाच्या प्रगतीचे पंख असलेल्या युवा पिढीला दिशा देण्याचे कार्य ‘सूर्यदत्त’ संस्था व चोरडिया दाम्पत्य करीत आहे,”असे प्रतिपादन अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आचार्य लोकेश मुनी यांनी केले. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या २६ व्या वर्धापनदिनी २२ व्या ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’ व सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ वितरण समारंभात डॉ. आचार्य लोकेश मुनी बोलत होते. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या बावधन कॅम्पसमध्ये आयोजित समारंभावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद, एमआयटीचे अधिष्ठाता प्रा. डॉ. शरदचंद्र दराडे, उद्योजक विठ्ठलशेठ मणियार, सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया आदी उपस्थित होते.
गौर गोपाल दास यांनी आपल्या अमोघ वाणीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रत्येकजण कर्तृत्वाने आपले मोठेपण सिद्ध करतो. त्यामुळे आपल्या बाह्यरूपापेक्षा अंतर्मन चांगले हवे. सकारात्मक मानसिकता व कौशल्य आत्मसात करून विधायक कार्य उभारावे, असे त्यांनी नमूद केले. श्याम जाजू म्हणाले,”देशात वेगाने परिवर्तन व प्रगती होत आहे. यामध्ये सूर्यदत्तसारख्या संस्थांचे योगदान मोलाचे आहे. गुणग्राहकता ही भारतीयांची ओळख आहे. समाजातील कर्तृत्ववान लोकांचा सन्मान समाजाला प्रेरणा देतो. हेच काम सूर्यदत्त गेली २२ वर्षे करीत आहे.” प्रा. डॉ. शरदचंद्र दराडे म्हणाले, “संस्थेच्या स्थापनेपासून सोबत आहे.
चोरडिया दाम्पत्याने जिद्दीने, चिकाटीने संस्था वाढवली. हजारो विद्यार्थ्यांना घडवले. विद्यार्थ्यांसमोर आदर्श जीवनाचे दर्शन घडवण्यासाठी हा पुरस्कार सोहळा महत्त्वाचा असतो.” अतिशय खडतर संघर्षातून सूर्यदत्त संस्थेची प्रगती झाली असून, या प्रवासात संजय चोरडिया यांना सुषमा यांची योग्य साथ मिळाल्याने हा यशाचा टप्पा गाठता आल्याचे विठ्ठलशेठ मणियार म्हणाले.
कठोर परिश्रम, जिद्द, सातत्यपूर्ण प्रयत्न, चांगली ध्येय आणि राष्ट्राप्रतीचे प्रेम आपल्याला यशोमार्गावर घेऊन जात असल्याचे सतीश घोरमाडे यांनी नमूद केले. वैभव निंबाळकर म्हणाले की, देशासाठी त्याग आणि बलिदानाची भावना ठेवून निर्भयपणे सैनिक सीमेवर लढतात. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आपल्या संघर्ष व संकटाशी दोन हात करण्याचे बळ देते. संघर्ष, परिश्रम हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असतो. प्रास्ताविकात प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी हा पुरस्कार सोहळा विद्यार्थ्यांना प्रेरणा व ऊर्जा देणारा असल्याचे सांगितले.
दीपस्तंभासारखे कार्य करणाऱ्या समाजातील विविध क्षेत्रात भरीव योगदान दिलेल्या व्यक्तींना गेली बावीस वर्षे सूर्यदत्त जीवनगौरव व सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. डॉ. राजेंद्र जगदाळे यांनी संशोधन, इनोव्हेशन व स्टार्टअप संस्कृती अधिक व्यापक होण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडले. सर्व मान्यवरांनी पुरस्कारप्राप्त व्यक्तींचा गौरव केला व सूर्यदत्त संस्थेच्या रौप्य महोत्सवी वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या. आनंद सिंह, प्रशांत पितालिया यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा चोरडिया यांनी आभार मानले.
या मान्यवरांचा झाला गौरव
अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज यांना ‘सूर्यरत्न – द सेंट ऑफ मॉडर्न इंडिया’ पुरस्कार, ज्येष्ठ संगीतकार अनु मलिक, भारतीय शास्त्रीय संगीतकार उस्ताद तौफिक कुरेशी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, उद्योग व सामाजिक क्षेत्रातील नितीनभाई देसाई, लेफ्ट. जनरल अशोक आंबरे, राजयोगी बीके डॉ. गंगाधर, होप फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या अध्यक्षा अरुणा कटारा, व्हाईस ऍडमिरल सतीश घोरमाडे, उद्योजक डॉ. अरुण खन्ना, पटेल ब्रदर्स इंटरनॅशनलचे संस्थापक मफत पटेल, प्रकाश स्टील्सचे प्रकाश कानुगो, जनसेवा फाउंडेशनचे मीना शहा, न्यूट्री ऑर्गनायझेशनचे करणसिंह तोमर, श्रॉफ ग्रुपचे जयप्रकाश श्रॉफ, सामाजिक कार्यकर्त्या सीमा दाबके (दिव्यांग सेवा) यांना ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. प्रेरक वक्ते व अध्यात्मिक मार्गदर्शक गौर गोपालदास, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अतुल चोरडिया, प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळे, हिंदी साहित्यिका वंदना यादव, सांधेरोपण तज्ज्ञ डॉ. रमेश रांका, साईधाम कँसर क्लिनिकचे डॉ. स्वप्नील माने, कैलास भेळचे शिवराज मिठारे, सामाजिक कार्यकर्ते सीए राज देशमुख, भारतीय वित्त अधिकारी क्रांती खोब्रागडे, विधिज्ञ ऍड. प्रताप परदेशी, सुरेश इंदू लेझर्सचे संचालक वर्धमान शहा, पोलीस अधिकारी वैभव निंबाळकर, अश्विनी डायग्नोस्टिकचे सुनंदा सोमाणी यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’, स्पिरिच्युअल कॉर्पोरेट ट्रेनर प्रा. डॉ. दिनेश गुप्ता, व्यंकटेश बिल्डकॉनचे चेअरमन अंकुश आसबे, सामाजिक कार्यकर्ते अली असगर देखानी यांना सूर्यदत्त राष्ट्रीय विशेष पुरस्कार, विन एज्युटेकच्या अध्यक्षा खुशबू राजपाल यांना ‘सूर्यदत्त नॅशनल यंग अचिव्हर अवॉर्ड’, अरिजित बॅनर्जी, वरुण बुद्धदेव, अरमान उभरानी यांना ‘सूर्यदत्त लिट्ल मास्टर नॅशनल अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले.
