कथाकथनकार मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पराग पोतदार
पुणे : लहान मुलांमधील गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांचा विकास करण्यासाठी पालकांच्या आत्मविश्वासाचे पाठबळ गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू यांनी केले.
शब्दसारथीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘ऐक, एक गोष्ट सांगतो’ या राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेत विजेते ठरलेल्या मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी आयोजित केलेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी गो डिजिटल या कंपनीचे संचालक राहुल कांगणे आणि राहुल शिंदे यांची विशेष उपस्थिती होती.
ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून घेण्यात आलेल्या स्पर्धेत 100 हून अधिक विद्यार्थी पुण्यासह मुंबई, नाशिक, सातारा, सांगली, पाली, अलिबाग अशा विविध शहरांतून सहभागी झालेले होते. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून सचिन डांगे, वैशाली मोहिते, जयमाला कुलकर्णी यांनी काम पाहिले.
विजेत्या ठरलेल्या विद्यार्थ्यांना आज मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, मेडल्स आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
यावेळी मकरंद टिल्लू यांनी मुलांशी आणि पालकांशी दिलखुलास संवाद साधला. कथाकथन करताना आत्मविश्वास, शब्दोच्चार, देहबोली यांचे महत्त्व प्रात्यक्षिकासह विषद केले. पाणी बचत आणि पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ते करीत असलेल्या सामाजिक कामाची सविस्तर माहिती दिली.
प्रास्ताविक शब्दसारथीचे संचालक पराग पोतदार यांनी केले. गो डिजिटलचे संचालक राहुल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. कौशिक कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. मनीषा पोतदार यांनी आभार मानले.
