माथाडी बोर्डाचे नेते असल्याची बतावणी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये माथाडी बोर्डाचे नेते असल्याची बतावणी करुन गोदाम मालकाकडे प्रत्येक गाडीमागे 15 हजार रुपये खंडणी मागणाऱ्या संतोष उर्फ आण्णा देवकर व त्याच्या इतर पाच साथीदारांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
पुणे पोलिसांची सन 2024 मधील ही 13 वी मोक्का कारवाई आहे. अण्णा उर्फ संतोष किसन देवकर (वय – 34, रा. अक्वा मॅजेस्टिक सोसायटी, फुरसुंगी), शेखर अनिल मोडक (वय 29, रा. वडकी गावठाण), साहस विश्वास पोळ (वय 25, रा. सिद्धिविनायक अपार्टमेंट, वडकी, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
तसेच आणखी तिघांवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आयपीसी 387, 143, 147, 149, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टोळी प्रमुख संतोष उर्फ आण्णा देवकर हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.
त्याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार करुन हिंसाचाराचा वापर करुन, हिंसाचार करण्याची धमकी देऊन, धाकदपटशा दाखवुन, जुलूम जबरदस्तीने बेकायदेशीर कृत्य करत होता. या टोळीने मागील दहा वर्षात खुन करणे, खुनाचा प्रयत्न करणे, अपहरण करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, हत्यारे बाळगुन दहशत निर्माण करणे असे गुन्हे केले आहेत.
पुढील तपास हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख करीत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त आर राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार,पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके, तपास पथकाचे तेज भोसले, संदीप धनवटे, प्रशांत नरासाळे, मल्हारी ढमढेरे, रोहिणी जगताप यांच्या पथकाने केली.