सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्हाधिकार्यांना दिले निवेदन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
भूम : पवन चक्क्या तात्काळ बंद करा या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
सध्या भूम व वाशी तालुक्यात पवनचक्क्या धारकांनी शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने जमिनी खरेदी केलेल्या आहेत. भूम व वाशी डोंगराळ भाग असून या पवन चक्क्या बसवण्यासाठी मशिनरी, पंखे, ट्रान्समिशन, केबल जवळ पोहोचवण्यासाठी हजारो झाडे कापली आहेत.
आता लावलेली नवीन झाडे येण्यासाठी 30 ते 40 वर्षाचा काळ लागणार आहे. त्यामुळे भूम व वाशी तालुका हा वाळवंट करण्याच्या उद्देशाने पवनचक्कीचा घाट घालण्यात आला आहे.
पवन चक्क्यावर नेण्यात येणारे मशिनरी व उपकरणे नेण्यासाठी ट्रेलर व ट्रकांना रस्ता जमीन सपाट करून घाट तोडून बनवला आहे. तो रस्ता बनवताना जो मुरूम खनिज काढले जाते त्याची रॉयल्टी भरणे गरजेचे असताना ते तहसील कार्यालयात कुठलाही भरणा केला जात नाही.
या बाबीकडे तहसीलदार दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे. पवनचक्की बरोबर वायर पण लावली जाते ट्रान्सफॉर्मर व सबस्टेशन बनवली जातात. तसेच या ठिकाणी असणारे नैसर्गिक मोठे डोंगर नाले, ओढे नष्ट करून त्या ठिकाणी खांब लावले जात आहेत.
पंखे आणि मशनरीच्या आवाजामुळे पक्षी व वन्यजीव नाहीसे झालेले आहेत. तसेच या पवन चक्क्याच्या टर्बाईन ब्लेडला आदळून कित्येक पक्षी मृत पावत आहेत. तसे पाहिले तर पवनचक्की ज्या ठिकाणी शेती होऊ शकत नाही.
अशा ठिकाणी करणे गरजेचे असताना या पवनचक्क्या मात्र नैसर्गिक डोंगर पोखरून त्या डोंगरात साधारणपणे 1000 फूट भूभागात मोठे मोठे होल पाडून त्यात उभ्या केल्या जात आहेत.
या भागात शेतकरी आपली जनावरे चालण्यासाठी घेऊन जात होते पण पवनचक्कीमुळे आता त्या जनावरांना चारा उपलब्ध होणार नाही. या पवनचक्क्यांनी नियमांचे उल्लंघन करून वर्षानुवर्षी पूर्वीचे झाडे तोडली आहेत.
या झाडे तोडल्यामुळे पशुपक्ष्यांना चाऱ्याची मोठी समस्या भविष्यकाळात निर्माण होऊ शकते. तसेच या टर्बाइन ब्लेड वर आढळून मोठ्या प्रमाणात पक्षांची कत्तल होणार आहे.
या परिसरात राष्ट्रीय पक्षी मोर मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांचा मृत्यू या पवनचक्कीच्या ब्लेड मध्ये अडकून होणार आहे. या बाबीकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिले पाहिजे.
तसेच कोणतीही परवानगी न घेता वृक्षतोड होत असल्याने भूम वाशी तालुका पहिला दुष्काळग्रस्त असून यामुळे पावसाचे प्रमाण कमी होऊन शेतकऱ्यांना याचा भविष्यकाळात फटका बसू शकतो.
या बाबतीत बऱ्याच शेतकऱ्यांनी तक्रारी केलेले आहेत पण त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे. पवन चक्क्याच्या आवाजामुळे आजूबाजूला असणाऱ्या गावांना व वन्यजीव प्राणी ससा, हरीण, रान मांजर, घोरपड अन्य प्राणी नष्ट होण्याची शक्यता आहे.
पवन चक्क्या म्हणजे एक सायलेंट किलर असून भविष्यात या भूम व वाशी तालुक्यासाठी घातक ठरणार आहेत अशा प्रकारचे निवेदन भूम शहरातील सर्वपक्षीयांनी जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांना दिलेले आहे.
पवनचक्क्याचे काम दिनांक 12 मार्च 2024 पर्यंत बंद करण्यात आले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव या ठिकाणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश आप्पा शेंडगे, राष्ट्रवादीचे नेते आबासाहेब मस्कर, भाजप तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर, अनुसूचित जाती जमाती भाजपा तालुकाध्यक्ष प्रदीप साठे ऑल इंडिया पॅंथर सेनेचे कार्याध्यक्ष चंद्रमणी गायकवाड आमरण उपोषणास बसणार आहेत.