डॉ. डी.वाय. पाटील महाविद्यालयात राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल
पिंपरी चिंचवड : आकुर्डी स्थित डॉ. डी. वाय. पाटील औषध निर्माण महाविद्यालयांमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ प्रायोजित राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत इंद्रायणी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, तळेगाव महाविद्यालयाने बाजी मारत प्रथम क्रमांक पटकाविला.
राज्यभरातील ४१ पदविका औषध निर्माण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेमध्ये एक विजेते व दोन उपविजेते संघ निवडले गेले. त्यांना चषक, प्रमाणपत्र व अनुक्रमे पंधरा हजार, दहा हजार आणि पाच हजार रोख रक्कम बक्षीस म्हणून प्रदान करण्यात आले.
या तीन स्तरीय स्पर्धेमध्ये गहलोत इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नवी मुंबई संघाने द्वितीय व चन्नाबसवेश्वर पॉलिटेक्निक कॉलेज (डी. फार्म) यांनी तृतीय स्थान मिळविले. या स्पर्धेमध्ये एमआयटी, पुणे फार्मसी महाविद्यालयाचे डॉ. अनिल पवार, डॉ. अक्षय बाहेती, डॉ. चंद्रशेखर बोबडे व एआयएसएसएमएस कॉलेज ऑफ फार्मसीचे डॉ. राहुल पडळकर यांनी परीक्षकांचे काम बघितले.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण व समारोप प्रसंगी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे उपसचिव मोहम्मद उस्मानी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. अशा स्पर्धेच्या आयोजना मागील महत्व विषद केले. यावेळी प्राचार्य नीरज व्यवहारे, डॉ. अक्षय बाहेती व डॉ. अनिल पवार यांची भाषणे झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. आशिष चिंबाळकर, प्रा. आरती सोनवणे, प्रा. पल्लवी सोमठाणे व विद्यार्थी प्रतिनिधी साहिल शेंडगे व श्रेया बोऱ्हाडे यांनी अथक परिश्रम घेतले.

















