वाहनासह पावणेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
पंढरपुर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने शनिवारी पहाटेच्या सुमारास टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथे एका कारमधून गोवा राज्य निर्मित विदेशी दारूचा साठा जप्त केला.
समाधान गायकवाड, (वय 19 वर्षे, रा. गायकवाड वस्ती, टाकळी सिकंदर) याला अटक करण्यात आले आहे. या कारवाईत एकूण दोन लाख बहात्तर हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पंढरपूर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पंकज कुंभार यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी टाकळी सिकंदर (ता.मोहोळ) येथे पंढरपूर ते कुरुल रोडवर सापळा रचत पाळत ठेवली असता त्यांना समाधान गायकवाड हा त्याच्या टाटा इंडिका क्र. MH12 NX 2193 या वाहनातून गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंद असलेला विदेशी दारूचा साठा वाहतूक करत असल्याचे आढळून आले.
वाहनाची झडती घेतली असता त्यात कागदी खाकी पुठ्ठ्याच्या बॉक्स मध्ये गोवा राज्य निर्मित 750 मिली क्षमतेच्या रॉयल क्लास व्हिस्कीच्या 122 सीलबंद प्लास्टिक बाटल्या, ऍड्रियल क्लासिक व्हिस्कीच्या 70 सीलबंद बाटल्या, मॅकडॉल नंबर वन व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 48 सीलबंद प्लास्टिक बाटल्या तसेच विदेशी मद्याचे बनावट तीन हजार बुचे मिळून आले.
आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मोहोळ यांच्या समोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस दोन दिवसाची कस्टडी मंजूर केली आहे.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, पुणे विभागाचे उपायुक्त सागर धोमकर यांच्या आदेशानुसार तसेच अधीक्षक नितीन धार्मिक व उपअधीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे, सहायक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे, जवान विजयकुमार शेळके, प्रकाश सावंत व वाहनचालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली.
