पुणे गुन्हे शाखेची कारवाई
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : वारजे पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार मोक्का कारवाई केल्यानंतर फरार झाला होता. पोलीस मागील दोन वर्षापासून शोध घेत होते. मात्र तो पोलिसांना सापडत नव्हता. अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने आरोपीला सोलापूर येथून अटक केली आहे.
सिद्राम उर्फ अभी रमेश मंजिली (वय- 24) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वारजे पोलीस ठाण्यात 2022 मध्ये दाखल असलेल्या आयपीसी 307, 504, 506, 34, आर्म ॲक्ट गुन्ह्यात मोक्का कायद्याचा अंतर्भाव करण्यात आला होता.
मोक्का कारवाई झाल्यानंतर आरोपी मंजिले फरार झाला होता. पोलीस त्याचा दोन वर्षापासून शोध घेत होते. आरोपी सिद्राम उर्फ अभी मंजिले हा सोलापूर, रविवार पेठत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस नाईक राजेंद्र लांडगे व पोलीस हवालदार अमोल आवाड यांना मिळाली.
माहितीची खातरजमा करून खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस उप निरीक्षक यशवंत ओंबासे व टीमने सोलापूर येथे जाऊन आरोपीला बालाजी चौकात सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला पुढील तपासासाठी वारजे पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-1 सुनील तांबे व खंडणी विरोधी पथक 1 चे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंत ओंबासे, पोलीस हवलदार सयाजी चव्हाण, अमोल आवाड, राजेन्द्र लांडगे, अमर पवार यांच्या पथकाने केली.
