महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
सोलापूर : मोटार सायकल चोरी, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून जबरी चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी सुनिल अकोले (वय-३३ वर्षे, रा ४३, न्यु सुनिल नगर, एमआयडीसी, सोलापूर) याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आल्याचे पोलिस आयुक्तालयाने सांगितले.
सन २०१५ ते २०२३ या कालावधीमध्ये, मोटार सायकल चोरी करणे, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून जबरी चोरी करणे यासारखे अनेक गुन्हे सुनील अकोले याच्याविरुद्ध दाखल आहेत.
त्याच्याविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.
या प्रस्तावानुसार पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे यांनी कार्यवाही करुन त्यांच्याकडील तडीपार आरोपी यास सोलापूर जिल्हा व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता, २२ मार्च २०२४ पासून तडीपार केले आहे. त्याला तडीपार केल्यानंतर स्वारगेट, पुणे येथे सोडण्यात आलेले आहे.
