लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ
बार्शी : मंजूर केलेले मेडिकल बिलाचे पैसे देण्यासाठी बार्शी पंचायत समितीतील सहाय्यक लेखाधिकारी, लिपिक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर अशा तिघांना दोन हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
या प्रकरणी कनिष्ठ लिपिक अविनाश देसाई (वय ५०) सहा. लेखाधिकारी बाबासाहेब सुभाष माने (वय ४०), डाटा एन्ट्री ऑपरेटर निखिल दत्तात्रय मांजरे (वय ३२) या तिघांना लाच घेताना पकडण्यात आले.
तक्रारदार यांना २०२१ मध्ये कोविडचा संसर्ग झाला होता.
तसेच तक्रारदार यांची आई पाय घसरून पडून डोक्यास मार लागला होता. त्याबाबत उपचाराचा खर्च तक्रारदार यांनी केला होता. उपचाराकरता झालेल्या खर्चाचे बिल मिळण्यासाठी 2021 मध्ये तक्रारदार यांनी सोलापूर जिल्हा परिषदेकडे अर्ज केला होता. त्यांचे बिल मंजूर होऊन पंचायत समिती बार्शी येथील अर्थ विभागाकडे बिल अदा करण्यासाठी निधी प्राप्त झाला होता.
हे पैसे देण्यासाठी लोकसेवक अविनाश देसाई यांनी तक्रारदार यांच्याकडे बिल देण्यासाठी बाबासाहेब माने यांचे नावे दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर बाबासाहेब माने यांनीही बिल देण्यासाठी दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. कंत्राटी कर्मचारी निखिल मांजरे यांच्यामार्फत लाच रक्कम स्वीकारली.
आरोपी बाबासाहेब माने व निखील मांजरे यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आलेला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार संतोष नरोटे, गजानन किनगी, राहुल गायकवाड यांनी यशस्वीरित्या पूर्ण केली.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शितल जानवे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार संतोष नरोटे आदींनी पार पाडली.
लाच लुचपत प्रतिबंध विभागातर्फे सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की भ्रष्टाचार संबंधित काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकांबद्दल अथवा त्यांच्या वतीने लाच मागणाऱ्या खाजगी व्यक्तीबद्दल तक्रार असल्यास त्वरित लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे टोल फ्री क्रमांक १०६४ दूरध्वनी क्रमांक २१७२३१२६६८ वर संपर्क साधावा.