फरासखाना पोलीसांची कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल
पुणे : सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोन महिला आरोपींना जेरबंद करण्यात फरासखाना पोलीसांना यश आले आहे.
नाझमा शेख ( वय ४३, रा- २९५ बुधवार पेठ, ढमडेरे बोळ), रेणु राठोड, (वय-४१, रा- २९५ बुधवार पेठ, ढमढेरे बोळ, पुणे) या दोघींना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी यांचा सहा वर्षांचा मुलगा खेळायला गेला होता. परंतु तो घरी आला नाही. त्यामुळे मुलाचा आजुबाजुच्या परिसरात शोध घेतला परंतु तो सापडला नाही.
आपल्या मुलास अज्ञात व्यक्तीने पळवुन नेले म्हणुन त्याच्या पालकांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अपहरण झालेल्या मुलाला व त्याला पळवून नेणाऱ्यांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार वैभव स्वामी, प्रविण पासलकर, सुमित खुटटे, संदीप कांबळे, राकेश क्षीरसागर यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले.
त्यात या मुलाला दोन अनोळखी महिला संशयीतरित्या रिक्षातुन घेऊन जात असल्याचे दिसुन आले. त्या रिक्षाचा नंबर तपासुन रिक्षा चालकाकडुन माहिती घेतली. त्याने दिलेल्या माहितीनुसार, या महिला त्याच्याच परिसरात राहत होत्या. त्यापैकी एका महिलेस ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. तिने गुन्हयाची कबुली दिली. तिला पोलिसांनी अटक केली.
अपहृत मुलगा हा दुसऱ्या महिलेकडे होता. ही महिला अपहृत मुलास घेऊन स्वारगेट एस टी स्टॅन्ड परिसरात संशयितरित्या फिरत असल्याचे समजले. या पथकाने तिथे जाऊन या महिलेला पकडले.
तिनेही गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर तिला अटक केली.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त परिमंडळ १ पुणे, संदीप सिंह गिल, सहाय्यक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग रुक्मीणी गलंडे यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, वैभव गायकवाड, पोलीस उप निरीक्षक जयसिंग दाढे, पोलीस उप निरीक्षक, निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मेहबुब मोकाशी, अविनाश गोपनर, गोविंद गुरव, प्रमोद मोहिते, समीर माळवदकर, अर्जुन कुडाळकर, महिला पोलीस अंमलदार आशा कांबळे, जयश्री पवार, पुनम ओव्हाळ, अनिता महाडीक, मिनाज शेख, उज्वला बनसोडे यांच्या पथकाने केली आहे.